नागपूर रेल्वेस्थानक झाले ९६ वर्षांचे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:09 AM2021-01-16T04:09:41+5:302021-01-16T04:09:41+5:30
दयानंद पाईकराव नागपूर : भारताचे मध्यस्थान म्हणून नागपूर रेल्वेस्थानकाचा देशात नावलौकिक आहे. येथे दिवसाकाठी ४० हजारांहून अधिक प्रवासी आणि ...
दयानंद पाईकराव
नागपूर : भारताचे मध्यस्थान म्हणून नागपूर रेल्वेस्थानकाचा देशात नावलौकिक आहे. येथे दिवसाकाठी ४० हजारांहून अधिक प्रवासी आणि शेकडो गाड्या दररोज ये-जा करतात. या गाड्यांनी स्टेशनवर पोहचणाऱ्या देशभरातील प्रवाशांना भावते ती नागपूर रेल्वेस्थानकाची ऐतिहासिक इमारत. आपल्या या ऐतिहासिक इमारतीला आज ९६ वर्षे पूर्ण होत आहेत. ब्रिटिशकालीन वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेली नागपूर रेल्वेस्थानकाची ऐतिहासिक इमारत प्रवाशांच्या सेवेसाठी आजही मजबूतपणे दिमाखात उभी आहे.
झीरो मॉईलजवळ आणि सीताबर्डी किल्ल्याच्या पायथ्याशी नागपूर रेल्वेस्थानकाची ही देखणी इमारत उभी आहे. या ऐतिहासिक इमारतीचा शुभारंभ तत्कालीन मध्यप्रांत वऱ्हाडचे गव्हर्नर फ्रँक स्लाय यांनी १५ जानेवारी १९२५ साली केला. या इमारतीवर ब्रिटिशकालीन वास्तुकलेचा प्रभाव आहे. संपूर्ण इमारत लाल-पांढऱ्या वाळू पाषाणांनी बांधलेली आहे. ही इमारत दोन मजली असून देखणा दगडाचा पोर्च आहे. इमारतीच्या पहिल्या माळ्याला जाळीसह गोलाकार कमानी असून दुसऱ्या माळ्यावर कॉलमसह जाळी लावलेल्या चौकोनी खिडक्या तयार करण्यात आल्या आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीनंतर नागपूर रेल्वेस्थानकाच्या इमारतीचा क्रमांक लागतो. ही इमारत दोन मजली असून देखणा दगडाचा पोर्च आहे. या इमारतीचा दर्शनी भाग सिव्हिल लाईन्स, किंग्ज वे कडे ठेवण्यात आला आहे. नागपूर रेल्वेस्थानक हे देशाच्या केंद्रस्थानी असल्यामुळे चारही दिशांनी रेल्वेस्थानकावर गाड्या येतात. यात ऐतिहासिक वारसा लाभलेली नागपूर रेल्वेस्थानकाची इमारत प्रवाशांचे लक्ष वेधून घेते. इमारतीची नियमित देखभाल करून या ऐतिहासिक इमारतीला जपण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या इमारतीची शोभा वाढविण्यासाठी यावर रंगीबेरंगी आणि विविध सणांना वेगवेगळ्या संकल्पना साकार करण्यासाठी विशेष प्रकारची लायटिंग लावण्यात आली असून यामुळे या इमारतीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत आहे.
...............
आधी शुक्रवारी तलावाजवळ होते स्टेशन
नागपूर रेल्वेस्थानकावर १८६७ साली मुंबई-नागपूर ही पहिली रेल्वेगाडी धावली. त्यानंतर नागपूर शहर १८८१ मध्ये छत्तीसगड राज्य रेल्वेच्या वतीने मीटर गेजने हावडापर्यंत जोडण्यात आले. त्यानंतर १८८१ मध्ये नागपूर-बंगाल ही रेल्वेगाडी धावली. १८८८ मध्ये बंगाल नागपूर रेल्वे कंपनीने हा मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित केला. सन १८६७ मध्ये नागपूर रेल्वेस्थानक शुक्रवारी तलाव आणि एम्प्रेस मिलच्या परिसरात होते. त्यानंतर १९२४ मध्ये बांधकाम पूर्ण करून १५ जानेवारी १९२५ ला ती प्रवाशांच्या सेवेसाठी खुली करण्यात आली.
व्हिक्टोरियन क्लॉकला पूर्ण झाले १०६ वर्षे
नागपूर रेल्वेस्थानक १९१५ पासून सुरू झाले. त्यावेळी व्हिक्टोरियन क्लॉक रेल्वेस्थानकावर लावण्यात आले आहे. आजही हे घड्याळ प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. हे घड्याळ नागपूरकरांच्या परिचयाचे झाले असून रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीची शोभा वाढवित आहे. याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावून महामानवाला अभिवादन करण्यात आले आहे.
..