फ्रान्सची कंपनी बनविणार नागपूर रेल्वेस्थानक ‘वर्ल्ड क्लास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:10 PM2018-10-04T12:10:39+5:302018-10-04T12:12:20+5:30
नागपूर रेल्वेस्थानक वर्ल्ड क्लास बनविण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेने पुन्हा एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्याकरिता भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळ तयारीला लागले आहे.
आनंद शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानक वर्ल्ड क्लास बनविण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेने पुन्हा एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्याकरिता भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळ तयारीला लागले आहे. वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने नागपूर रेल्वेस्थानकाची जबाबदारी फ्रान्सच्या इनिया आर्किटेक्ट कंपनीकडे सोपविल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली.
या कामासाठी २ कोटी ६५ लाख ३० हजार ८७७ रुपयांचा खर्च येणार आहे. याकरिता महामंडळाने इनिया आर्किटेक्ट कंपनीसोबत १९ जुलै २०१८ ला करार केला आहे. ही कंपनी स्टेशनचे आर्किटेक्चरल डिझाईन बनवित आहे. या डिझाईनला आयआरएसडीसीकडून मंजुरी मिळाल्यानंतर नागपूर रेल्वेस्थानक वर्ल्ड क्लास होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.
भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळाने आंतरराष्ट्रीय मानकानुसार नागपूर रेल्वेस्थानकाला विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत नागपूरसह ग्वाल्हेर आणि बायेप्पलहालीच्या (बेंगळुरू) नवीन रूपरेषेसंदर्भात निर्णय घेण्यात येणार होता. स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया २० नोव्हेंबर २०१७ पासून सुरू झाली. स्पर्र्धेचे विजेते फ्रान्सच्या इनिया आर्किटेक्ट कंपनीची निवड करण्यात आली.
वित्तीय सल्लागार व विकासक नियुक्त
सार्वजनिक खासगी भागीदारीच्या (पीपीपी) आधारावर साकार होणाऱ्या नागपूरच्या वर्ल्ड क्लास रेल्वेस्थानकाकरिता महामंडळाने सीबीआरई साऊथ एशिया प्रा.लि.ला वित्तीय सल्लागार आणि बन्सल पाथवे हबीबगंज प्रा.लि.ला विकासक म्हणून नियुक्त केल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली. महामंडळातर्फे स्थानकाचे एक एरियल व्ह्यू स्केच जारी करण्यात आले आहे. यामध्ये स्थानक अत्याधुनिक आणि अत्यंत सुंदर दिसत आहे.
‘माझी मेट्रो’मध्ये इनियाचे डिझाईन
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात फ्रान्सच्या इनियाची महत्त्वाची भूमिका आहे. या कंपनीने मुंजे चौकातील इंटरचेंज मेट्रो स्टेशन आणि पटवर्धन स्कूलसमोर साकार होणाºया झिरो माईल्स मेट्रो स्टेशनचे आर्किटेक्चरल डिझाईन तयार केले आहे. त्या आधारावर बांधकाम सुरू आहे.