हीच का नागपूर रेल्वेस्थानकाची ‘वर्ल्ड क्लास’कडे वाटचाल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:54 AM2018-03-19T11:54:27+5:302018-03-19T11:54:43+5:30
नागपूर रेल्वेस्थानकाला वर्ल्ड क्लास बनविण्याची तयारी सुरू असताना रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्मची अवस्था वाईट झाली आहे. प्लॅटफार्मवर खड्डे पडले असून टाईल्स तुटल्या असून प्रवासी अडखळून पडण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाला वर्ल्ड क्लास बनविण्याची तयारी सुरू असताना रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्मची अवस्था वाईट झाली आहे. प्लॅटफार्मवर खड्डे पडले असून टाईल्स तुटल्या असून प्रवासी अडखळून पडण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यानंतर रेल्वेस्थानकावरील विकास कामे ठप्प झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावरील समस्यांची पाहणी केली असता प्लॅटफार्म क्रमांक दोन आणि तीनवर अनेक खड्डे पडलेले असून जागोजागी टाईल्स उखडल्याचे चित्र दृष्टीस पडले. अशा स्थितीत प्रवाशांना रेल्वेगाडीत बसण्याची कसरत करावी लागत आहे. अनेकदा खड्ड्यात अडखळल्यामुळे प्रवाशांना किरकोळ जखमा होतात. एवढेच नाही तर प्लॅटफार्म क्रमांक चार आणि पाचवर टाईल्स लावण्यात आली. परंतु त्याचे सिमेंटीकरण करण्यात आलेले नाही. वर्षभरापूर्वी प्लॅटफार्म क्रमांक एकवर लावण्यात आलेल्या ग्रेनाईटलाही २५ ठिकाणी तडा गेल्याचे चित्र आहे. प्रवाशांना रेल्वेगाडीपासून दूर ठेवण्यासाठी टाईल्सने बनविण्यात आलेली पिवळी लाईनही अनेक ठिकाणी उखडली आहे.
थातूरमातूर कामामुळे पडले गेट
मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या दौऱ्याच्या वेळी उद्घाटन झालेल्या मूलताई रेल्वेस्थानकाचे प्रवेशद्वार हवेमुळे खाली पडले. पांढुर्णा रेल्वेस्थानकावरही प्लॅटफार्म क्रमांक २ वर शौचालयाचे काम आतापर्यंत सुरू आहे. मूलताईचे गेट पडल्याची तक्रार मिळताच रेल्वे प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराविरुद्ध चौकशी समिती गठित केली असून समितीच्या अहवालानंतर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.