नागपुरात रेल्वेने प्रवाशांना परत केले २१.५८ लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 09:13 PM2020-05-25T21:13:24+5:302020-05-25T21:15:43+5:30
मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांनी आरक्षण केलेल्या तिकिटांचे पैसे अडकून पडले होते. त्यासाठी दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाने आणि मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने तिकिटांची रक्कम परत करणे सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांनी आरक्षण केलेल्या तिकिटांचे पैसे अडकून पडले होते. त्यासाठी दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाने आणि मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने तिकिटांची रक्कम परत करणे सुरू केले आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने सोमवारी ३,१४३ तिकिटे तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ६४ तिकिटे रद्द करून २१,५८,२६५ रुपये परत केल्याची नोंद करण्यात आली आहे. तिकिटांची रक्कम परत घेण्यासाठी नागरिकांनी आरक्षण केंद्राच्या बाहेरपर्यंत रांगा लावल्या होत्या.
कोरोनामुळे २२ मार्चपासून रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले. बहुतांश प्रवाशांनी ३ महिने आधीच आरक्षणाची तिकिटे खरेदी केली होती. लॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वेचे आरक्षण कार्यालयही बंद करण्यात आले होते. परंतु रेल्वेने आरक्षणाच्या तिकिटांची १०० टक्के रक्कम आरक्षण कार्यालय सुरू झाल्यानंतर परत करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने २५ मे रोजी पहिल्याच दिवशी ३,१४३ तिकिटे रद्द केली. या रद्द केलेल्या तिकिटांच्या मोबदल्यात रेल्वेला २१,०८,४८० रुपये परत करावे लागले. तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने २५ मे रोजी ९ आरक्षण केंद्रावरून ६४ तिकिटे रद्द करून प्रवाशांना ४९,७८५ रुपये परत केले आहेत. तीन महिन्यांपासूून तिकिटांचे पैसे अडकल्यामुळे प्रवाशांकडून हे पैसे कधी परत करण्यात येतील, अशी सातत्याने विचारणा होत होती. आता रेल्वेने तिकिटांची रक्कम परत करणे सुरु केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
अशी होईल तिकिटांची रक्कम परत
२२ ते ३१ मार्चपर्यंतच्या तिकिटांची रक्कम २६ मेपासून
१ ते १४ एप्रिलपर्यंतच्या तिकिटांची रक्कम १ जूनपासून
१५ ते ३० एप्रिलपर्यंतच्या तिकिटांची रक्कम ७ जूनपासून
१ ते १५ मेपर्यंतच्या तिकिटांची रक्कम १४ जूनपासून
१६ ते ३१ मेपर्यंतच्या तिकिटांची रक्कम २१ जूनपासूून
१ ते ३० जूनपर्यंतच्या तिकिटांची रक्कम २८ जूनपासून