Nagpur Rain : नागपुरात ढगफुटी, महापूर; रस्त्यांवर तरंगली वाहने, महिलेचा मृत्यू
By कमलेश वानखेडे | Published: September 23, 2023 01:47 PM2023-09-23T13:47:12+5:302023-09-23T13:49:02+5:30
४ तासात १०० मि.मी. हून अधिक पाऊस : नागनदी, पिवळीनदीचे पाणी वस्त्यांत शिरले
नागपूर : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरात पूर परिस्थती निर्माण झाली. चार तासात १०० मि.मी. हून अधिक पाऊस कोसळल्याने ढगफुटीसारखी स्थिती निर्माण झाली. अंबाझरी व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो झाल्याने नागनदी, पिवळी नदीला पूर आला. पुराचे पाणी सखल भागांतील झोपडपट्टींसह पॉश वस्त्यांमध्येही शिरले. नागरिकांना जीव वाचविण्यासाठी धडपड करावी लागली. महेश नगर येथील मिराबाई पिल्ले (वय ७०) या महिलेचा मृत्यू झाला.
अंबाझरी परिसरातील डागा ले-आऊईटमध्ये घरांमध्ये चार फुटांवर पाणी गेल्याने येथील नागरिकांना बचाव पथकाने बोटीने बाहेर काढले. फ्लॅट स्कीममध्ये, रस्त्यांवर पार्क केलेल्या कार पाण्यावर तरंगताना दिसल्या. मोरभवनमध्ये पाणी साचल्याने आपली बसचे प्रवासी अडकले. रेल्वे स्टेशनमध्येही पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल झाले. दुपारी १२ पर्यंत शहरातील बहुंतांश मार्गांवरील वाहतूक बंद होती.
नंदनवन झोपडपट्टीत नागनदीचे पाणी शिरल्याने लोकांची एकच तारांबळ उडाली. या भागातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझ्ड झाली आहे. परिसरातील वस्त्यातही पाणी शिरले आहे. स्वातंत्र्य गल्ली क्र.४ व ६ झोपडपट्टी भागास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी भेट दिली. लोकांच्या समस्या जाणून घेतली.नागनदीला पूर आल्याने नंदनवन झोपडपट्टीतील घरात घाण पाणी साचल्याने लोकांनी रात्र जागून काढली. घरातील पाणी बदल्यांनी बाहेर काढण्यात अनेकांची रात्री गेली.
सकाळी ८.३० पर्यंत ११६. ५ मिमी पाऊस
मध्यरात्री २ वाजतापासून सुरू झालेला पाऊस पहिल्या दोन तासांमध्ये ९० मिमी बरसला. तर हवामान खात्याने केलेल्या नोंदीनुसार सकाळी ८.३० पर्यंत ११६.५ मिमी ची नोंद करण्यात आली. मुसळधार पावसामुळे गोरेवाड्याचे २ गेट उघडण्यात आले. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.