नागपुरात पाच पूरबळी; दहा हजार घरांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 10:30 AM2023-09-25T10:30:56+5:302023-09-25T10:31:57+5:30
पंचनाम्याला सुरुवात : तातडीने मदतकार्य
नागपूर : नाग नदीला आलेल्या महापुरामुळे नागपुरातील सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून, १४ जनावरेही दगावली आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासन यांनी संयुक्तपणे नुकसानीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे.
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या अतिवृष्टीत नागपूरकरांना मोठा फटका बसला. शहरातील अंबाझरी तलावातील पाण्याचा ओव्हर फ्लो होऊन हे पाणी नाग नदीत प्रचंड प्रवाहाने शिरले. नदीकाठावरील घरांमध्ये पाणी घुसले. अंबाझरी आणि वर्मा लेआऊट तसेच शंकरनगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी वस्तीमध्ये शिरले. त्यामुळे अन्नधान्यासह इतर साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व घटनाक्रमात पाच जणांचा मृत्यू झाला. यात महेशनगर परिसरातील मीराबाई पिल्ले (७० वर्षे), तेलंगखडी परिसरातील सुरेंद्रगड येथील संध्या ढोरे (८० वर्षे), संजय गाडेगावकर (५२, रा. अयोध्यानगर), कृष्णकुमार लेखराम बरखंडी (वय २१, रा. राणी डोंगरी जमबाडा, जि. बैतुल) आणि एक अनोळखी या मृतांचा यात समावेश आहे.
दरम्यान, रविवारी दुपारपासून नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात झाली. पंचनामे तातडीने व्हावे, यासाठी मनुष्यबळ वाढविण्यात आले आहे. महानगरपालिकेचे ६० कर संग्राहक, १५ महसूल निरीक्षक, १० सहायक अधीक्षक यांची टीम जिल्हा प्रशासनाच्या दिमतीला आली. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या तहसील कार्यालयाकडे उपलब्ध असणाऱ्या १६ तलाठ्यांच्या मदतीला ग्रामीण भागातील आणखी २८ तलाठ्यांची मदत घेण्यात आली आहे.
यासंदर्भात रविवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्यासह उपविभागीय अधिकारी तहसीलदार व महसूल विभागाचे तलाठी, महानगरपालिका प्रशासनाचे कर संग्राहक, महसूल निरीक्षक, सहायक अधीक्षक उपस्थित होते.
- उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नुकसानीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश जारी केले. त्यानंतर फडणवीस यांनी रविवारी सकाळी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. डागा लेआऊट, कॉर्पोरेशन कॉलनी, शंकरनगरसह इतर वस्त्यांना भेट देऊन त्यांनी येथील नागरिकांशी संवाद साधला. तसेच घरात चिखलामुळे झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली. नाग नदीला आलेल्या पुराची तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटनेची संपूर्ण माहिती यावेळी त्यांनी घेतली. भविष्यात अशा घटना टाळण्यात येतील, असेही नागरिकांना त्यांनी सांगितले.
यावेळी माजी महापौर संदीप जोशी, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.