Nagpur Rain : ६१ वर्षानंतर सप्टेंबरमध्ये २४ तासांत सर्वाधिक पाऊस
By निशांत वानखेडे | Published: September 23, 2023 02:44 PM2023-09-23T14:44:13+5:302023-09-23T14:46:04+5:30
१५९.६ मि.मी. ची नोंद, मुसळधार हाहाकार : रस्ते, वस्त्या पुराने वेढले, घरांची पडझड
निशांत वानखेडे
नागपूर : शुक्रवारी मध्य रात्रीपासून सकाळपर्यंत चार तासात ढगफुटीसदृश्य पावसाने नागपूर शहरात दाणादान उडवून दिली आहे. शहराच्या सीमेलगतच्या व सखल वस्त्या अक्षरश: पुराने वेढल्या आहेत तर मध्यवर्ती वस्त्याही जलमय झाल्या.
सकाळपर्यंत ढगांमधून कहर बरसल्यासारखी स्थिती होती. दोन तासात ९० मि.मी., तर अवघ्या १२ तासात तब्बल १५९.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. नागपुरात सप्टेंबर महिन्यात १९६२ साली २४ तासात सर्वाधिक १८४.४ मि.मी. पाऊस झाला होता. त्यानंतर झालेली आजची सर्वाधिक नाोंद ठरली आहे. यावर्षीही संपूर्ण पावसाळ्यात २४ तासात झालेली ही सर्वाधिक नोंद ठरली.
हवामान विभागाने २४ तास ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार पावसाने नागपुरात अक्षरश: हाहाकार माजविला. सखल भागातील अनेक वस्त्या जलमय झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर मध्यवर्ती वस्त्याही पुराने वेढल्या होत्या. रामदासपेठ, धंतोली, पंचशील चौक, सीताबर्डी या भागात पूरसदृश्य स्थिती झाली होती. लोकांची घरे, दुकान, प्रतिष्ठानामध्ये पाणी शिरले व काेट्यवधीचे नुकसान झाले. या भागात रुग्णालयांची संख्या अधिक आहे. पहिल्या माळ्यापर्यंत पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना बोटींद्वारे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. उच्चभ्रू म्हणून मानल्या जाणाऱ्या या वस्त्यांमध्ये अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच नागरिकांनी ही स्थिती अनुभवली.
दहा वर्षातही विक्रम
गेल्या दशकभरातही एकाच दिवशी एवढा पाऊसनागपूरकरांनी अनुभवला नाही. गेल्या वर्षी १३ सप्टेंबरला २४ तासात सर्वाधिक १२७.४ मि.मी. पाऊस झाला होता. विशेष म्हणजे अनेक वर्षात सप्टेंबरमध्ये झालेल्या मासिक पावसापेक्षा अधिक पाऊस आज २४ तासात झाला आहे.
२४ तास अलर्टवरच
दरम्यान हवामान विभागाने आणखी २४ तास ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात अति ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. २४ सप्टेंबरला पावसाचा जोर ओसरले. मात्र वेधशाळेने पुढच्या २७ सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट दिला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
नागपूरचा बॅकलॉग भरून निघाला
गेले काही दिवस पाऊस न झाल्याने पावसाचा बॅकलॉग १५ टक्क्यावर गेला होता. मात्र दोन दिवसात हा बॅकलॉग भरून निघाला असून शुक्रवार-शनिवारच्या पावसामुळे सरासरीपेक्षा सरप्लस टक्केवारी गाठली आहे. शहरात ११०० मि.मी.च्या वर पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या काही दिवसात संपूर्ण मान्सूनची सरासरी गाठण्याची शक्यता आहे.