Nagpur Rain Video : होडी बनलेल्या बसेसमध्ये जीव मुठीत घेऊन त्यांनी काढले चार तास
By नरेश डोंगरे | Published: September 23, 2023 02:24 PM2023-09-23T14:24:28+5:302023-09-23T14:25:36+5:30
मोरभवन बसस्थानक बनला तलाव, एसटी बसेस बनल्या होडी : चालक वाहकांचे जीव लागले होते टांगणीला
नरेश डोंगरे
नागपूर : रात्रीचे २ वाजले होते. विजांच्या कडकडाटाने रेस्टरूम मध्ये असलेल्या एसटीच्या चालक वाहकांची झोप उडाली होती. दाराच्या आतमधून पाणी रेस्टरूममध्ये शिरत असल्याचे पाहून एकाने दरवाजा उघडला अन् पाण्याचा लोंढा अचानक आत शिरला. कंबरेपर्यंत पाणी आत आल्याने चालक वाहकांनी आहे त्या स्थितीत खुंटीला टांगलेले कपडे हातात घेऊन स्थानक परिसरात उभ्या असलेल्या बसमध्ये धाव घेतली. काही वेळपर्यंत तेथे ठिक होते. नंतर मात्र पाणी हळुहळू वर येऊ लागले. बसच्या खिडक्यांच्या वितभर खाली पाणी आल्याने बसचालक वाहकांचे जीव टांगणीला लागले होते. तब्बल चार तास त्यांनी तशीच प्रतिक्षा केली अन् अखेर सकाळी त्यांना आपत्ती निवारण पथकाची मदत मिळाली. ते सुखरूप बाहेर आले तेव्हा कुठे त्यांच्या श्वासात श्वास आला.
शहराच्या मध्यवर्ती भागात मोरभवन बसस्थानक आहे. या स्थानकाच्या बाजुनेच मोठा नाला वाहतो. बस स्थानकांच्या प्रांगणाचा उतार त्याकडेच आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ढगफुटी सदृष्य पाऊस कोसळल्यामुळे मोरभवन बस स्थानकात नाल्याचे पाणी शिरले. पाण्याचे प्रमाण एवढे जास्त होते की स्थानकाला तलावाचे स्वरूप आले. यावेळी स्थानकाच्या रेस्ट रूममध्ये १२ एसटी बसेसचे चालक, वाहक मुक्कामी होते. मेघगर्जना अशी होती की, लाखो नागपूरकरांसह या चालक वाहकांचीही झोपमोड झाली होती. काही वेळेतच रेस्ट रूमच्या दारातून पाणी आत येऊ लागले. ते पाहून घाबरलेल्या एकाने दार उघडले आणि बाहेर वाहनाच्या पावासाचा लोंढा आतमध्ये शिरला. हे दृष्य बसस्थानकात मुक्कामी असलेल्या या बसेसच्या चालक, वाहकांच्या काळजात धस्स करणारे होते.
होडी बनलेल्या बसेसमध्ये जीव मुठीत घेऊन त्यांनी काढले चार तास #NagpurRainshttps://t.co/CbvSFUB0GJpic.twitter.com/00AXRcs0pY
— Lokmat (@lokmat) September 23, 2023
धोक्याचे संकेत मिळाल्यानंतर सर्वच्या सर्व चालक - वाहक कसेबसे एकमेकांना आधार देत प्रांगणात उभ्या असलेल्या निघाले. ते बसमध्ये बसले अन् काही वेळेनंतर बसच्या खिडकीपर्यंत पाणी चढू लागले. एसटी बसेस पाण्यात अक्षरश: होडीसारख्या हलू लागल्या तशी अनेकांच्या काळजाची धडधडही वाढली. त्यांनी पहाटे ३ च्या सुमारास आपल्या वरिष्ठांना, पोलिसांना तसेच अग्निशमन दलाला माहिती देऊन मदतीची याचना केली.
पहाटे ४ वाजता एसटीचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे, अभियंता नीलेश धारगावे, आगार व्यवस्थापक स्वाती तांबे, कार्यशाळा अधीक्षक हुलके, सुरक्षा अधिकारी डोंगरे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले. अग्निशमन दल आणि पोलिसांचा ताफाही पोहचला. अंधारात जाणे धोक्याचे ठरणार असल्याने बसमध्ये असलेल्यांना सुरक्षेसंबंधाने मोबाईलवरूनच सूचना देन्यात आल्या. उजाडल्यानंतर सकाळी ७ वाजता सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे तब्बल चार तास जीव मुठीत घेऊन असलेल्या चालक-वाहकांच्या जीवात जीव आला.