नागपूर-रामटेकमध्ये अटीतटीचा सामना की एकतर्फी ठरणार विजेता ?

By योगेश पांडे | Published: June 3, 2024 07:09 PM2024-06-03T19:09:40+5:302024-06-03T19:11:53+5:30

उद्या होणार फैसला : कोण होणार सिकंदर : गडकरी की ठाकरे, बर्वे की पारवे ?

Nagpur-Ramtech will be a close match or a one-sided winner? | नागपूर-रामटेकमध्ये अटीतटीचा सामना की एकतर्फी ठरणार विजेता ?

Nagpur-Ramtech will be a close match or a one-sided winner?

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
लोकसभा निवडणुकीचे बहुप्रतिक्षित निकाल मंगळवारी जाहीर होणार असून नागपूररामटेक लोकसभा मतदारसंघात मतदार राजाने नेमका कुणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे. मागील सव्वा महिन्यापासून निकालांबाबत वेगवेगळे कयास लावले जात होते. आता कुणाचे दावे खरे ठरले व कुणाचे आकडे हवेत विरले यावरुन पडदा हटणार आहे. साधारणत: दुपारनंतर कल लक्षात येणार असला तरी निकालाचे अंतिम आकडे हाती यायला वेळ लागणार आहे.

विशेषत: नागपूर मतदारसंघाकडे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एकीकडे भाजपाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर दुसरीकडे कॉंग्रेसचे विकास ठाकरे अशी येथे लढत आहे. तर दुसरीकडे रामटेकमधून शिंदेसेनेचे राजू पारवे व कॉंग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यात थेट सामना आहे. वृत्तवाहिन्यांवरील ‘एक्झिट पोल्स’नंतर नागपूर-रामटेकचा गड महायुती राखणार की महाविकासआघाडी अनपेक्षित धक्का देणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
कळमना मार्केट यार्डमध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल व साधारणत: दुपारपर्यंत कलाचे चित्र स्पष्ट होईल. निवडणूकांच्या तारखेची घोषणा होण्याअगोदरच नागपुरचे राजकीय वातावरण तापले होते. प्रचारादरम्यान विविध पक्षाच्या नेत्यांनीदेखील नागपुरात उपस्थिती लावून जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांना साद घातली. दरम्यान, मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी झाली असून पोलिसांचादेखील कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पंतप्रधानांपासून या नेत्यांच्या झाल्या सभा
रामटेक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. तर नागपुरात कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी सभा घेतली. याशिवाय उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती, खासदार मनोज तिवारी यांच्या सभांचेदेखील आयोजन करण्यात आले.

कोणता मतदारसंघ फिरवू शकतो निकाल ?
नागपूर पूर्व व नागपूर उत्तर या मतदारसंघात ५५ टक्क्यांच्या वर मतदान झाले. नागपूर उत्तरमधून २०१९ मध्ये नितीन गडकरी पिछाडीवर होते. यावेळी महाविकासआघाडीने तेथे ताकद लावली होती. तर नागपूर पूर्वमधून गडकरींना विक्रमी मताधिक्य होते. यावेळी तेथून मागील वेळपेक्षा जास्त लीड मिळेल असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. नागपुरात हे दोन मतदारसंघ निकालात महत्त्वाचे ठरणार आहेत.

याअगोदरच्या निवडणूकीत असे होते चित्र
२०१४ व २०१९ च्या निवडणूकीत नितीन गडकरी यांनी सलग दोनदा विजय मिळविला. २०१४ मध्ये गडकरी यांनी विलास मुत्तेमवार यांच्यावर २ लाख ८४ हजार ८४८ मतांनी तर २०१९ मध्ये पटोले यांना २ लाख १६ हजार ९ मतांनी पराभूत केले होते. तर रामटेक मतदारसंघात २०१४ मध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी कॉंग्रेसचे मुकुल वासनिक यांना १ लाख ७५ हजार १०१ मतांनी व २०१९ मध्ये कॉंग्रेसचेच किशोर गजभिये यांना १ लाख २६ हजार ७८३ मतांनी हरविले होते.

विधानसभा मतदारसंघनिहाय असे झाले होते मतदान
मतदारसंघ :                   एकूण मतदार :                    मतदान :                    मतदानाची टक्केवारी

नागपूर दक्षिण-पश्चिम :           ३,७६,४०८ :                   १,९९,२५८ :                         ५२.९४
नागपूर दक्षिण :                     ३,७२,४९५ :                    २,००,९९८ :                         ५३.९६
नागपूर पूर्व :                          ३,८७,७६२ :                   २,१६,२७४ :                         ५५.७८
नागपूर मध्य :                         ३,१५,८४९ :                    १,७१,४४१ :                          ५४.२८
नागपूर पश्चिम :                       ३,६५,३४३ :                   १,९६,२८७ :                          ५३.७३
नागपूर उत्तर :                        ४,०५,४२४ :                    २,२३,४८० :                          ५५.१२

नागपूर लोकसभा
एकूण उमेदवार : २६
एकूण मतदार : २२,२३,२८१
झालेले मतदान : १२,०७,७३८
टक्केवारी : ५४,३२ %

रामटेक लोकसभा
उमेदवार : २८
मतदार : २०,४९,०८५
झालेले मतदान : १२,५०,१९०
टक्केवारी : ६१.०१ %

Web Title: Nagpur-Ramtech will be a close match or a one-sided winner?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.