नागपूर- रामटेक मार्गावरील टोल नाका बंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:57 AM2018-07-18T00:57:06+5:302018-07-18T00:57:55+5:30
नागपूर- रामटेक मार्गावर आमडी फाट्यानजीक असलेला रामटेक टोल नाका बंद करण्यासाठी नागरिकांनी केलेल्या आंदोलनांची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेतली आहे. मंगळवारी दिल्ली येथे गडकरी यांनी याबाबत बैठक घेतली. तीत यावर निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर- रामटेक मार्गावर आमडी फाट्यानजीक असलेला रामटेक टोल नाका बंद करण्यासाठी नागरिकांनी केलेल्या आंदोलनांची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेतली आहे. मंगळवारी दिल्ली येथे गडकरी यांनी याबाबत बैठक घेतली. तीत यावर निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती अभ्यासानंतर महिनाभरात आपला अहवाल देईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे.
बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, एनएचएआयचे सचिव, भाजपा नेते विकास तोतडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. रामटेक पथकर नाका बंद करण्याची रामटेक आणि नागपूरवासीयांची दीर्घ काळापासूनची मागणी आहे. या पथकर नाक्यामुळे रामटेकवरून नागपूरला येणाऱ्या व नागपूरवरून रामटेकला जाताना पथकर द्यावा लागत आहे. या पथकराला नागरिकांनी विरोध केला होता.
मध्यंतरीच्या काळात हा पथकर नाका बंद व्हावा म्हणून नागरिकांनी आंदोलनेही केली असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पथकर बंद करण्यासंदर्भात निवेदनेही पाठविण्यात आली होती. नागरिकांची मागणी लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिल्लीत या बैठकीचे आयोजन केले होते.
कन्हानचा पूलही बांधणार
रामटेक मार्गावरच कन्हान नदीवरील जुना पूल अतिशय जीर्ण झाला असून कधीही कोसळण्याची भीती आहे. या मार्गावर ट्रकची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. जुना पूल इंग्रजांच्या काळातील असून शंभर वर्षापेक्षा अधिक काळ या जुन्या पुलाला झाला आहे. या मार्गावर नवीन चार पदरी पूल लवकरात लवकर उभारला जावा अशी नागरिकांची मागणी असून लवकरच हा पूलही केला जाणार आहे.