‘प्रोमो रन’मध्ये धावले नागपूर; आता प्रतीक्षा ११ फेब्रुवारीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:09 AM2018-01-29T11:09:16+5:302018-01-29T11:12:03+5:30
उगवत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने रविवारी नागपूरकर स्वत:च्या आरोग्यासाठी धावले. त्यांनी ‘प्रोमो रन’मध्ये सहभागी होऊन नागपुरात कस्तूरचंद पार्कवर ११ फेब्रुवारीला होणाºया महामॅरेथॉनसाठी ‘है तयार हम’ असल्याचे दाखवून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उगवत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने रविवारी नागपूरकर स्वत:च्या आरोग्यासाठी धावले. त्यांनी ‘प्रोमो रन’मध्ये सहभागी होऊन नागपुरात कस्तूरचंद पार्कवर ११ फेब्रुवारीला होणाऱ्या महामॅरेथॉनसाठी ‘है तयार हम’ असल्याचे दाखवून दिले.
‘आय रन फॉर मायसेल्फ’ अशी साद देत ‘लोकमत’ने महामॅरेथॉन आयोजित केली आहे. त्याची रंगीत तालीम असलेल्या प्रोमो रनमध्ये सहा वर्षांच्या मुलांपासून ८१ वर्षांच्या वृद्धांपर्यंतच्या व्यक्तींचा समावेश होता. ज्येष्ठ धावपटूंचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा होता.
सर्वाधिक लक्ष वेधले ते सरस्वती विद्यालयाची ‘केजी टू’ची विद्यार्थिनी अश्मिता पिल्लई हिने. चिमुकल्या अश्मिताने ५ कि.मी. शर्यत पूर्ण केली. ८१ वर्षांचे शंकरराव बेलसरे यांचा उत्साह तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला. सहभागी धावपटूंनी रविवारी स्वत:च्या क्षमतेची कसोटी पाहिली. सर्वांनी ‘महामॅरेथॉन’ पूर्ण करून विजेतेपदाला गवसणी घालण्याचा या प्रोमो रनमध्ये निर्धार केला. उत्साही वातावरणामुळे महामॅरेथॉनबद्दल अनेक धावपटूंना उत्सुकता लागून राहिली आहे. या रनसाठी नागपूर जिल्हा अॅथ्लेटिक्स असोसिएशनचे सहकार्य मोलाचे ठरले. यात सचिव डॉ. शरद सूर्यवंशी, डॉ. विवेकानंद सिंग, रामचंद्र वाणी, जितेंद्र घोरदडेकर, डॉ. शारदा नायडू, बंटीप्रसाद यादव, राजेश भुते, प्रवीण टोंग, विद्या देवघरे (धापोडकर) आदींचा समावेश होता.