कमी ‘रिकव्हरी रेट’मध्ये नागपूर दुसऱ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:25 AM2020-12-15T04:25:43+5:302020-12-15T04:25:43+5:30
नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या डिसेंबर महिन्यात स्थिर असल्याचे दिसून येत असले तरी ‘रिकव्हरी रेट’ म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ...
नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या डिसेंबर महिन्यात स्थिर असल्याचे दिसून येत असले तरी ‘रिकव्हरी रेट’ म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र घटले आहे. विशेष म्हणजे, विदर्भातील ११ जिल्ह्यांमधून सर्वात कमी दर अकोला जिल्ह्याचा आहे. दुसऱ्या क्रमांकावर नागपूर जिल्हा आहे. अकोल्याचा रिकव्हरी रेट ८९.६२ टक्के तर नागपूर जिल्ह्याचा ९१.८३ टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वात जास्त आहे.
विदर्भात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. दरदिवशी रुग्णसंख्येचे विक्रम मोडित निघत होते. यामुळे चिंतेचे वातावरण होते. परंतु ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा वेग मंदावला. नोव्हेंबर महिन्यात तर सप्टेंबर महिन्याच्या तुलनेने दुपटीने रुग्ण कमी झाले. दिवाळीपूर्वी रुग्णसंख्या कमी झाली असली तरी नंतर ती वाढून या महिन्यात स्थिर झाल्याचे दिसून येत आहे. १२ नोव्हेंबर रोजी नागपूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९३.६१ टक्के होता. दरम्यानच्या काळात तो १.७८ टक्क्याने कमी होऊन १४ डिसेंबर रोजी ९१.८३ टक्क्यांवर आला. जिल्ह्यात सध्या ५,७८२ रुग्ण उपचाराखाली असून, १,०७,६३२ रुग्ण बरे झाले आहेत.
-बुलडाण्याचा रिकव्हरी रेट ९६ टक्के
राज्यातील रिकव्हरी रेट ९३ टक्के आहे. मुंबईचा हाच दर ९२ टक्के तर नागपूरचा ९१.८३ टक्के आहे. विदर्भाचा विचार केल्यास बुलडाणा जिल्ह्याचा ९६.०५ टक्के, त्याखालोखाल अमरावती जिल्ह्याचा ९५.४७ टक्के, चंद्रपूर जिल्ह्याचा ९४.६६ टक्के, यवतमाळ जिल्ह्याचा ९४.३६ टक्के, गडचिरोली जिल्ह्याचा ९४.२७ टक्के, गोंदिया जिल्ह्याचा ९४.२६ टक्के, वाशीम जिल्ह्याचा ९४ टक्के, वर्धा जिल्ह्याचा ९३.५७ टक्के, भंडारा जिल्ह्याचा ९२.३२ टक्के तर अकोला जिल्ह्याचा ८९.६२ टक्के आहे.
जिल्हारिकव्हरी रेट
अकोला ८९.६२ टक्के
नागपूर ९१.८३ टक्के
भंडारा ९२.३२ टक्के
वर्धा ९३.५७ टक्के
वाशीम ९४.०० टक्के
गोंदिया ९४.२६ टक्के
गडचिरोली ९४.२७ टक्के
यवतमाळ ९४.३६ टक्के
चंद्रपूर ९४.६६ टक्के
अमरावती ९५.४७ टक्के
बुलडाणा ९६.०५ टक्के
नागपूर जिल्ह्यातील बरे झालेले रुग्ण
१,०७,६३२