लसीकरणात नागपूर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 11:41 PM2021-06-16T23:41:09+5:302021-06-16T23:41:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासनाने कोविड लसीकरण मोहिमेत चांगली भरारी घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ...

Nagpur ranks third in vaccination in the state | लसीकरणात नागपूर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

लसीकरणात नागपूर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

Next
ठळक मुद्देपुणे, मुंबईनंतर नागपूरचा क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासनाने कोविड लसीकरण मोहिमेत चांगली भरारी घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० लक्ष ७१ हजार ६३१ नागरिकांनी लस घेतली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरणामध्ये पुणे आणि मुंबईनंतर नागपूर जिल्हा २९.३४ टक्केवारीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सन २०११ च्या लोकसंख्येनुसार नागपूर शहर आणि जिल्ह्याची लोकसंख्या ४६,५३,५७० इतकी आहे. कोरोना लसीकरणासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करावी लागते. ही नोंदणी म्हणजे तेवढ्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे, असे समजले जाते. १६ जानेवारी २०२१ ला नागपुरात लसीकरण सुरू झाले. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील गंभीर आजार असणारे व्यक्ती, त्यानंतर ४५ वर्षांवरील सर्वच नागरिक टप्प्याटप्प्याने लसीकरण सुरू करण्यात आले. कोविन अ‍ॅपवरील नोंदणीनुसार नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत १०,७१,६३१ इतक्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्याकरिता १३,६५,४४८ डोस देण्यात आलेले आहेत.

पुणे जिल्ह्याची लसीकरणाची लोकसंख्येच्या (२०११ च्या लोकसंख्येच्या आधारे) तुलनेत टक्केवारी ३६.६२ इतकी असून, लसीकरणात क्रमांक एकवर आहे. मुंबईने दुसरा क्रमांक पटकाविला असून, ३४.५४ टक्के लोकांनी लस घेतली आहे. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात १९.०२ टक्के लसीकरण झाले असून, त्याखालोखाल नाशिक जिल्हा १८.२६, ठाणे जिल्हा १८.०९ आणि औरंगाबाद जिल्हा १७.७५ अशी लसीकरणाची टक्केवारी आहे.

महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात लसीकरण सुरू आहे. शहरात मंगळवार १५ जूनपर्यंत ५ लक्ष ३४ हजार ४५३ नागरिकांनी पहिला डोस व १ लाख ८२ हजार १९७ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. दोन्ही डोस मिळून ७ लक्ष १६ हजार ६५० नागरिकांची लसीकरण झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. मनपातर्फे लसीकरण आपल्या दारी, ड्राईव्ह इन व्हॅक्सिन, सोबतच जवळपास १०० केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. १८ ते ४४ वर्षांवरील परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिर लावून त्यांचे लसीकरण करण्यात येत आहे.

४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करावे

सध्या राज्य शासनाच्या निर्देशानुसार १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण बंदच आहे. मात्र, या वयोगटातील ज्या व्यक्तींनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता, त्यांच्यासाठी दुसऱ्या डोसची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी करून त्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेता येईल. ऑटोचालक, दुकानदार, डिलिव्हरी बॉय आदींसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. यासोबतच ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ हा विशेष उपक्रम सुरू आहे. दिव्यांगांसाठीही लसीकरणाची व्यवस्था यशवंत स्टेडियम येथील सीआरसी केंद्रावर केली आहे. ज्यांच्याकडे आधार कार्डसुद्धा नाही अशा निराधार नागरिकांनासुद्धा मनपातर्फे लसीकरण केले जात आहे. लवकरच १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू होणार असून, तेव्हा होणारी गर्दी टाळण्यास तत्पूर्वीच ४५ वर्षांवरील व्यक्तींनी लसीकरण करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Nagpur ranks third in vaccination in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.