नागपुरात पंतप्रधान आवास योजनेच्या नावाने हप्ता वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 08:13 PM2020-05-15T20:13:56+5:302020-05-15T20:17:03+5:30
पंतप्रधान आवास योजनेनुसार मिळालेल्या शासकीय घरात राहण्यासाठी गुंडाच्या मदतीने गरीब महिलेकडून पिस्तुलच्या धाकावर हप्ता वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान आवास योजनेनुसार मिळालेल्या शासकीय घरात राहण्यासाठी गुंडाच्या मदतीने गरीब महिलेकडून पिस्तुलच्या धाकावर हप्ता वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात दक्षिण नागपुरातील कुख्यात गुंड बंटी ठवरे, त्याचे साथीदार आकाश गुंडलवार आणि बादल सहारे यांचा हात असून घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार झाले आहेत.
भांडे प्लॉट येथील रहिवासी बंटी ठवरे याची परिसरात दहशत आहे. त्याच्या विरुद्ध खुन, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दंगा घडविण्यासह २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. काही दिवसापुर्वी पर्यंत तो जुगार अड्डा चालवून हप्ता वसुली करीत होता. नंदा रमेश वानखेडे (५०) या मजुरी करतात. त्यांचा पती रिक्षा चालवितो. एकाच वस्तीतील असल्यामुळे बंटी नंदाच्या मुलाला ओळखत होता. तो नंदाच्या मुलाला आपल्या सोबत राहण्यास सांगत होता. बंटीचे कारनामे माहीत असल्यामुळे नंदाने आपल्या मुलाला बंटीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे बंटीला राग आला होता. तो बुधवारी रात्री १२.३० वाजता नंदाच्या घरी पोहोचला. नंदा आपल्या कुटुंबासह घरात झोपल्या होत्या. बंटी आणि त्याच्या साथीदारांनी नंदाला आवाज दिला. परंतु संभाव्य धोका लक्षात आल्यामुळे नंदाने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे आरोपींना राग आला आणि ते दरवाजा तोडून नंदाच्या घरात शिरले. बंटी आणि त्याच्या साथीदारांनी नंदाला शिवीगाळ करणे सुरु केले. तिला घरात राहण्याच्या मोबदल्यात दर महिन्याला ५ हजार रुपये देण्यास सांगितले. नंदाने या घटनेची तक्रार सक्करदरा पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी हप्ता वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तिन्ही आरोपी फरार झाले. जुगार अड्ड्याच्या वादात काही दिवसांपूर्वीच भांडे प्लॉट चौकात प्रतिस्पर्धी गुन्हेगारांनी बंटीवर हल्ला केला होता. पोलिसांनी बंटीच्या तक्रारीवरून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बंटी सक्रिय झाला होता. दरम्यान पोलिसांचा बेजबाबदारपणा समोर आल्यामुळे सक्करदराच्या ठाणेदाराची बदली करण्यात आली होती. त्यामुळे या घटनेला पोलिसांनी गंभीरपणे घेतले आहे.