सी-२० परिषदेतील पाहुण्यांसाठी नागपूर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2023 09:44 PM2023-03-15T21:44:20+5:302023-03-15T21:47:10+5:30

Nagpur News जी-२० परिषदेंतर्गत नागपुरात आयोजित होणाऱ्या सी-२० परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात सुशोभीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

Nagpur ready for guests of C-20 conference | सी-२० परिषदेतील पाहुण्यांसाठी नागपूर सज्ज

सी-२० परिषदेतील पाहुण्यांसाठी नागपूर सज्ज

googlenewsNext

नागपूर : येत्या आठवड्यात जी-२० परिषदेंतर्गत नागपुरात आयोजित होणाऱ्या सी-२० परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात सुशोभीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. पाहुण्या देशांचे ध्वज, टायगर कॅपिटलची ओळख दर्शविणारी वाघाची प्रतिमा, स्वागतासाठी उभे असलेल्या महाराष्ट्राच्या पारंपरिक वेशातील दाम्पत्य, प्रसिद्ध लोकनृत्य लावणी चितारण्यात आलेली आकर्षक चित्रे आणि वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष लागवडीची कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामेही पूर्णत्वास येत आहेत.

येथील विमानतळावर सी-२० परिषदेसाठी येणाऱ्या देश-विदेशातील प्रतिनिधींचे आगमन होणार आहे. पाहुण्यांच्या स्वागतासाठी विमानतळ परिसर सज्ज होत आहे. स्थानिक प्रशासनाच्या वतीने सुरू असलेली विमानतळ परिसरातील सुशोभीकरणाची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. विमानतळातून बाहेर पडताच जी-२० परिषदेच्या सदस्य देशांचे ध्वज आणि नागपुरात सी-२० परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींचे स्वागत करणारे ध्वज झळकले आहेत. विमानतळाच्या नाम फलकाखालील परिसरात वर्तुळाकार, त्रिकोणी आणि वेटोळ्या आकाराची टॉपअरी झाडे लावण्यात आली आहेत. पोर्चमधून बाहेर निघताना पाहुण्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राच्या पारंपरिक वेशभूषेतील उभे असलेल्या दाम्पत्यांची चित्रे चितारण्यात आली आहेत. महाराष्ट्राचा गौरव असलेली लावणी नृत्याची झलकही येथे दिसून येते.

- टाकाऊ वस्तूंपासून वाघाची सुंदर प्रतिमा येथील आकर्षण

दुचाकी, चार चाकी वाहनांच्या निरुपयोगी भागांपासून निर्मित वाघाची प्रतिमा येथील टर्मिनल मेनडोम परिसरात लावण्यासाठी सज्ज झाली आहे. टायगर कॅपिटल ही नागपूरची ओळख दर्शविणारी येथील प्रतिमा आतापासूनच प्रवाशांसाठी आकर्षण ठरत आहे.

- आकर्षक वृक्षांच्या पाच हजार कुंड्या सजत आहेत

सी-२० परिषदेचे प्रतिनिधी विमानातून बाहेर पडल्यापासून पोर्चमध्ये येईपर्यंतच्या परिसरात बकुळ, रॉयल पाम, ट्रॅव्हलर पाम आदी १४ प्रजातींची वृक्षे पाच हजार कुंड्यांमध्ये लावण्यासाठी सज्ज होत आहेत. व्हर्टीकल गार्डन, जी-२० च्या सदस्य देशांच्या राष्ट्रीय भाषेत ‘नागपुरात आपले स्वागत आहे’ हा संदेश असणारे मोठे फलक उभारण्यात येत आहेत.

- उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनखाली अवतरली आदिवासींची गौरवशाली परंपरा

वर्धा रोडवरील उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनच्या पिलरदरम्यान विदर्भातील आदिवासी व त्यांची गौरवशाली परंपरा दर्शविणारे देखावे लावण्यात आले आहेत. यामुळे या परिसरास देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Web Title: Nagpur ready for guests of C-20 conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.