नववर्षाच्या स्वागतासाठी संत्रानगरी सज्ज : सर्वत्र उत्साहाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 07:53 PM2017-12-29T19:53:04+5:302017-12-29T19:55:41+5:30
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागताकरिता संत्रानगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागताकरिता संत्रानगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. विशेषत: तरुणाईमध्ये जोशपूर्ण वातावरण आहे. स्वागताच्या पद्धतीमध्ये वैविध्यता पहायला मिळणार आहे. कुठे आधुनिक धूमधडाका केला जाणार आहे तर, कुठे पारंपरिक साधेपणा पाळला जाणार आहे. व्यावसायिकांनी कौटुंबिक उत्साह व तरुणाईमधील जल्लोष पाहता त्यांच्याकरिता वेगवेगळी व्यवस्था केली आहे. आता प्रत्येकाला केवळ ३१ डिसेंबरच्या रात्रीची प्रतीक्षा आहे.
कार्यक्रमांचे नियोजन
विविध कार्यक्रमांचे आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे. त्या यादीत ३१ डिसेंबरला रात्रीचे १२ वाजताचे केक कापणे, पुष्पवर्षाव करणे, देवापुढे नारळ फोडून नववर्ष सुखाचे जाऊ देण्याची प्रार्थना करणे, नातलग व मित्र मंडळींना शुभेच्छा देणे, शॅम्पेन उडविणे, फटाक्यांची रंगीबेरंगी आतषबाजी करणे, नृत्य व गायन करणे, स्वादिष्ट भोजन इत्यादी कार्यक्रमांचा समावेश आहे.
टेरेसवर सेलिब्रेशन
आजच्या महागाईच्या काळात प्रत्येकाला पर्यटनस्थळे, हॉटेल, रिसोर्टस्, रेस्टॉरेन्टस् व क्लब्जमध्ये जाऊन नवीन वर्षाचा जल्लोष करणे शक्य होत नाही. अशा व्यक्ती इमारतींच्या टेरेसवरच सेलिब्रेशन करणार आहेत. त्याकरिता पैसे गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. मद्य, खाद्य व अन्य कार्यक्रमांची यादी तयार केली जात आहे.
पर्यटनस्थळे ‘फुल्ल’
३१ डिसेंबरला शहरातील विविध तलाव, करमणूक पार्कस् व धार्मिकस्थळांसह खिंडसी, अदासा, रावणवाडी, गोसेखुर्द, पेंच, नवेगावबांध, अंबाखोरी, तोतलाडोह, नागझिरा, ताडोबा, बोर धरण, कोलितमारा, इटियाडोह इत्यादी पर्यटनस्थळे ‘फुल्ल’ राहणार आहेत. असंख्य नागरिकांनी या ठिकाणी जाऊन नववर्ष आगमनाचा आनंद साजरा करण्याचे बेत आखले आहेत.
अनोख्या पद्धतीने स्वागत
काहीजण दरवर्षी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, रुग्णांना फळवाटप, औषधे वाटप, शालेय साहित्य वितरण, खाद्य पदार्थ वितरण इत्यादी कार्यक्रम घेऊन अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करतात. ही परंपरा यंदाही कायम राहण्याची शक्यता आहे.
बाजारपेठांत विविध वस्तू
सीताबर्डी, सदर, इतवारी, महाल, धंतोली, धरमपेठ, सक्करदरा इत्यादी बाजारपेठांमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध वस्तू दाखल झाल्या आहेत. वस्तू खरेदीसाठी प्रत्येक दुकानात नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. फटाके मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत.
व्यावसायिकांचे पॅकेज जाहीर
‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन’ कार्यक्रम आयोजित करणाºया व्यावसायिकांनी व्हेजिटेरियन व नॉन-व्हेजिटेरीयन ग्राहकांसाठी आकर्षक पॅकेज जाहीर केले आहेत. मद्यप्रेमींसाठीही विशेष पॅकेज बनविण्यात आले आहेत. पॅकेजेसमध्ये भोजन, डीजे, लाईव्ह गाणे, नृत्य, मद्य इत्यादीचा समावेश आहे. काहीजणांचे पॅकेज महागडे तर, काहीजणांचे पॅकेज परवडणारे आहेत. महागड्या पॅकेजचा दर्जाही त्याच स्तरावरचा राहणार आहे. ‘कॅशलेस’चा पर्याय अपवाद वगळता सर्वच ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. एकूणच सांगायचे झाल्यास प्रत्येकाला ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन’मध्ये सहभागी होण्याची संधी आहे.
कॉलेज कट्यांवर गप्पा
कॉलेज कट्यांवर नववर्ष स्वागताच्या गप्पा रंगत आहेत. तसेच, नवीन वर्षात करावयाच्या संकल्पाबाबत चर्चा ऐकायला मिळत आहेत. तरुणाई प्रचंड उत्साहात आहे.
शुभेच्छापत्रे, फलक तयार
सार्वजनिक मंडळे, संस्था, संघटना, राजकीय पक्ष आदींनी नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी ग्रिटिंग्ज, फलके, बॅनर्स व पोस्टर्स तयार केले आहेत. तसेच, विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शुभेच्छांसाठी फेसबुक, व्हाट्स अॅप इत्यादी अॅप्सचाही मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे.