नागपुरात ३३ मिमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:09 AM2021-09-03T04:09:19+5:302021-09-03T04:09:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गुरुवारी सायंकाळी नागपुरात पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे दीड तास पडलेल्या पावसाची नोंद ३३ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुरुवारी सायंकाळी नागपुरात पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे दीड तास पडलेल्या पावसाची नोंद ३३ मिमी झाली आहे. मागील दोन दिवसांपासून नागपुरात पावसाची हजेरी सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजतानंतर झालेल्या दमदार पावसाने नागपूरकर पुन्हा सुखावले आहेत.
या आठवड्यात नागपूरसह विदर्भावर वरुणराजाची कृपा सुरू आहे. मागील आठवडा कोरडा गेला. या आठवड्यात तीन दिवसांपासून रोजच पाऊस पडत आहे. मागील २४ तासात नागपुरात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १३.५ मिली पावसाची नोंद झाली. तर सायंकाळनंतरचा पाऊसही जोरदार झाला. शहरातील पर्जन्यमानाच्या नोंदीनुसार, शहरात ३३ मिमीची नोंद आहे.
सकाळी वातावरण बरेच मोकळे होते. चांगले कडक उन्हही पडले होते. यामुळे वातावरणात उष्णतामान जाणवत होते. दुपारनंतर आभाळाचा नूर पालटला.
अरबी समुद्रातील वाऱ्यामुळे विदर्भात दबाव निर्माण झाल्याने हा पाऊस सुरू आहे. बंगालच्या खाडीत सायक्लाेनिक सर्कुलेशन वाढत असल्याने पुढील दोन दिवस असेच वातावरण राहणार आहे. वेधशाळेने या आठवड्यात पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात, तर आठवड्याच्या अखेरीस पश्चिम विदर्भात विजेच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.