दाेन दिवस उघाड, नंतर पुन्हा विजा अन् ढगाळ; हवामान विभागाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 12:22 PM2023-03-23T12:22:39+5:302023-03-23T12:23:15+5:30
दिवसा ढगांनी ऊन झाकले, रात्री तापमान वाढले
नागपूर : पाच दिवसांच्या अवकाळी पावसाच्या वादळी वातावरणानंतर बुधवारी ढगांनी शांतता धारण केली. दुपारी आकाश ढगांनी व्यापले; पण पावसाळी परिस्थिती झाली नाही. मात्र ढगांमुळे उन्हाचे चटके काहीसे कमी जाणवले. सध्याच्या परिस्थितीमुळे दिवसाचा पारा सरासरीच्या खाली घसरला आहे; पण रात्रीच्या तापमानाने उसळी घेतली आहे. पुढचे दाेन दिवस हवामान काेरडे राहणार असून, त्यानंतर पुन्हा विजा व वादळी परिस्थिती निर्माण हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दि. १५ मार्चपासून ढगांची उघडझाप व वादळवाऱ्याची स्थिती सुरू हाेती. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेकडाे हेक्टरच्या पिकांची नासाडीही केली आणि गडचिराेलीच्या विद्यार्थिनीसह तिघांचे बळी घेतले. यानंतर बुधवारी सकाळी निरभ्र असलेल्या आकाशात दुपारी मात्र ढगांच्या गर्दीने आकाश काळे झाले व पाऊस पडेल, अशी शक्यता निर्माण झाली हाेती. मात्र त्यानंतर ढगांनी जागा साेडली. आठवडाभरापासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे दिवसाचा पारा खाली घसरला असून, मार्चच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला आहे. नागपुरात बुधवारी ३२.२ अंश कमाल तापमानाची नाेंद झाली, जी सरासरीपेक्षा ५.४ अंशांनी कमी आहे. गाेंदिया, वर्धा व चंद्रपुरातही पारा ३ ते ४ अंशांनी खाली आहे. सर्वाधिक ३४.९ अंश तापमान अकाेल्यात नाेंदविण्यात आले, जे सरासरीपेक्षा ३.७ अंशांनी कमी आहे. त्याखालाेखाल अमरावती ३४.४ अंश व ब्रह्मपुरी ३४.६ अंश राहिले.
दिवसाचा पारा खाली असला तरी रात्रीच्या पाऱ्याने उसळी घेतली आहे. नागपुरात सर्वाधिक २१.६ अंश किमान तापमानाची नाेंद झाली. त्यानंतर वर्धा २१.४, यवतमाळ २१.२ व चंद्रपूरला २१ अंश तापमानाची नाेंद झाली.
दरम्यान, पुढचे दाेन दिवस २३ व २४ मार्चला हवामान काेरडे राहणार असून त्यानंतर २५ आणि २६ मार्चला पुन्हा ढगांची गर्दी हाेण्याचा अंदाज आहे. मात्र पाऊस हाेण्यापेक्षा विजांचा कडकडाट व वादळाची स्थिती अधिक राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.