हुडहुडी वाढली : नागपुरात तापमान १२.४ अंश, आतापर्यंतचा सर्वात थंड दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 11:06 AM2021-11-29T11:06:47+5:302021-11-29T11:10:31+5:30
नागपूर शहरात मागील ४८ तासात रात्रीच्या तापमानात ५.९ अंशाची घट नाेंदविण्यात आली. शनिवारी ४.७ अंश तर रविवारी १.२ अंश तापमान घटले. या कारणाने अचानक थंडीत वाढ झाली आहे.
नागपूर : मागील दाेन दिवसांपासून नागपूर शहरात पारा घटण्याचे सत्र सुरू आहे. रविवारी रात्रीचे किमान तापमान १२.४ अंशावर पाेहचले. ही सामान्यपेक्षा २ अंशाची घट असून या माेसमातील आतापर्यंतचा हा सर्वात थंड दिवस ठरला. पारा घटल्याने नागरिकांना हुडहुडी जाणवायला लागली आहे. पुढचे काही दिवस कडाक्याची थंडी जाणविण्याची शक्यता आहे.
हवामान विभागानुसार वातावरण काेरडे असल्याने तापमानात घट नाेंदविण्यात येत आहे. रविवारी सूर्यास्तानंतर वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचाही प्रभाव दिसायला लागला. सायंकाळी उत्तर-पूर्व दिशेने ७.५ किमी/तास वेगाने थंड वारे वाहत हाेते. येत्या ४८ तासापर्यंत तापमान सामान्यपेक्षा २ अंशाने कमी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण अंदमान सागरात ३० नाेव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार हाेत आहे, जे ४८ तासात पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेला वळणार आहे. यामुळे मध्य भारतातही ढगांची गर्दी जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीच्या तापमानात पुन्हा वाढ हाेईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, विदर्भात १२ अंश तापमानासह यवतमाळ सर्वाधिक थंड जिल्हा ठरला. नागपूर दुसऱ्या क्रमांकावर हाेते. याशिवाय गाेंदिया १२.८ अंश, वर्धा १३.९ अंश, अमरावती व चंद्रपूरमध्ये १४ अंश, बुलडाणा १५.२ अंश, अकाेला १५.४ अंश, वाशिम १६ अंश तर गडचिराेलीमध्ये १६.४ अंश किमान तापमानाची नाेंद करण्यात आली.
दाेन दिवसात ५.९ अंशाची घट
नागपूर शहरात मागील ४८ तासात रात्रीच्या तापमानात ५.९ अंशाची घट नाेंदविण्यात आली. शनिवारी ४.७ अंश तर रविवारी १.२ अंश तापमान घटले. या कारणाने अचानक थंडीत वाढ झाली आहे.
नाेव्हेंबरच्या शेवटी जाणवली थंडी
नाेव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला नागपूरचे तापमान १३.४ अंशावर पाेहचले हाेते. १० नाेव्हेंबरला १३.२ अंशाची नाेंद झाली. मात्र त्यानंतर पारा वाढायला लागला व ताे सामान्यपेक्षा ५ अंशापर्यंत वाढला. ढगाळ वातावरणामुळे तापमान वाढले व थंडीचा प्रभाव कमी झाला. मात्र मागील दाेन दिवसात पुन्हा तापमान सामान्यपेक्षा २ अंश खाली घसरल्याने हुडहुडी वाढायला लागली आहे.