नागपूर रेड झोन मध्येच : आजपासून नवीन आदेश अंमलात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 11:42 PM2020-05-21T23:42:02+5:302020-05-21T23:47:42+5:30

महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाउन संबंधिचे नवीन आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. नागपूर शहर रेड झोनमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आदेश २२ मे पासून अंमलात येणार आहेत. या आदेशामुळे नागपूर महापालिकेच्या हद्दीमध्ये रेड झोन संबंधीचे आदेश लागू राहतील, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी दिली.

In Nagpur Red Zone itself: New orders will come into effect from today | नागपूर रेड झोन मध्येच : आजपासून नवीन आदेश अंमलात येणार

नागपूर रेड झोन मध्येच : आजपासून नवीन आदेश अंमलात येणार

googlenewsNext
ठळक मुद्देमार्केट, मॉल्स आणि खाजगी कार्यालये राहणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाउन संबंधिचे नवीन आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. नागपूर शहर रेड झोनमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आदेश २२ मे पासून अंमलात येणार आहेत. या आदेशामुळे नागपूर महापालिकेच्या हद्दीमध्ये रेड झोन संबंधीचे आदेश लागू राहतील, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी दिली.
नवीन आदेशानुसार खाजगी कार्यालये पूर्णत: बंद राहणार आहेत. तसेच मार्केट, मॉल्स, टॅक्सी सेवा बंद राहणार असून फक्त स्टॅन्डअलोन स्वरूपातील दुकाने (ती ही एका ओळीत जीवनावश्यक सेवेशी संबंधित दुकाने वगळता जास्तीत जास्त पाच) सुरू राहतील, असेही आदेशात नमूद केले आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे १९ मे रोजी निर्गमीत करण्यात आलेल्या आदेशामध्ये नागपूरला रेड झोनमधून वगळण्यात आले होते. मात्र शहरात वाढते कोरोनाचे रुग्ण आणि त्यामुळे वाढता संसर्गाचा धोका लक्षात घेता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागपूरला रेड झोनमध्येच ठेवण्याची विनंती त्यांनी आयुक्तांनी राज्य शासनाला केली होती. त्यानुसार गुरूवारी रात्री उशीरा निर्गमीत करण्यात आलेल्या आदेशामध्ये नागपूर शहर रेड झोनमध्ये कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता शहरात खाजगी कार्यालये बंद राहणार असून अत्यावश्यक सेवेशी संबंधित शासकीय /निमशासकीय कार्यालये वगळता इतर शासकीय कार्यालये केवळ ५ टक्के कर्मचारी क्षमतेसहच तसेच जास्ती दहा कर्मचारी उपस्थितीसह सुरू राहणार आहेत.
यापूर्वी १७ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार स्टॅन्डअलोन स्वरूपात इलेक्ट्रिक सामुग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल, संगणक, मोबाईल, होम अम्प्लायन्सेस दुरूस्ती, (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार), ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार), ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार) अशाप्रकारे परवानगी देण्यात आली होती. परंतू आता यामध्ये बदल होणार असून दिवसाचे वर्गीकरण हटविण्यात आले आहे. तसेच स्टॅन्डअलोन स्वरूपातील सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवता येणार आहे.
प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे ती प्रतिष्ठाने फक्त सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरु राहतील. जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना मात्र परवानगी राहणार नाही.

सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत 'नाईट कर्फ्यू'
नवीन आदेशानुसार शहरात सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजतापर्यंत नाईट कर्फ्यू राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांच्या आवागमनावर बंदी राहणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाईट कर्फ्यूच्या काटेकोर पालना संबंधी पोलीस प्रशासनालाही आदेश दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईसुद्धा पोलीस विभागामार्फत होणार आहे

प्रतिबंधित क्षेत्रात कोणतीही शिथिलता नाही
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही सेवेला परवानगी देण्यात आली नाही. प्रतिबंधित क्षेत्रामधून कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाता येणार नाही किंवा बाहेरीला व्यक्तीला प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नाही.

निर्गमित करण्यात आलेली मानक कार्यप्रणाली
सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक
सार्वजनिक ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी थुंकल्यास दंड
सार्वजनिक ठिकाणी आणि वाहतूक साधनांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य
लग्न समारंभामध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करून जास्तीत जास्त ५० लोकांना परवानगी
अंत्यविधी प्रसंगी फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करून ५० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहू नये
सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू आदींच्या सेवनाला बंदी
दुकानांमध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फूट अंतर राखणे तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नाही

शहरात काय सुरू

मद्यालये (केवळ घरपोच विक्री)
वस्तू पुरवठा
उद्योगधंदे (फक्त अत्यावश्यक वस्तू)
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने
एकल स्वरुपाची दुकाने (मर्यादित)
ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू)
ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू वगळून)
बँक व फायनान्स
कुरियर, डाक सेवा
घरपोच रेस्टॉरंट सेवा
आरटीओ

शहरात काय बंद
शैक्षणिक संस्था
हॉटेल्स, रेस्टॉरंट्स
शॉपिंग मॉल
प्रार्थनास्थळे
टॅक्सी, कॅब, रिक्षा
जिल्हाअंतर्गत बस सेवा
खासगी बांधकाम
खासगी कार्यालय
सलून, स्पा
कृषी विषयक कार्य
स्टेडियम प्रेक्षकांविना
(प्रतिबंधित क्षेत्रात वैद्यकीय सेवा, वस्तूंचा पुरवठा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून सर्व बंद)

Web Title: In Nagpur Red Zone itself: New orders will come into effect from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.