नागपुरात नागरिकांनी अनुभवला वाफेचे इंजिन ते सुपरफास्ट रेल्वेचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:53 PM2018-04-11T23:53:04+5:302018-04-11T23:53:16+5:30

भारतात पहिली रेल्वेगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. ती आठवण जोपासण्यासाठी दरवर्षी १० ते १६ एप्रिल दरम्यान रेल्वे सप्ताह साजरा करण्यात येतो. मध्य रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा या सप्ताहाचे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे. त्यानिमित्त आयोजित तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन मध्य रेल्वेचे अप्पर महाव्यवस्थापक विशाल अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

Nagpur residents have experienced the journey of the steam engine from the steam locomotive to the superfast train | नागपुरात नागरिकांनी अनुभवला वाफेचे इंजिन ते सुपरफास्ट रेल्वेचा प्रवास

नागपुरात नागरिकांनी अनुभवला वाफेचे इंजिन ते सुपरफास्ट रेल्वेचा प्रवास

Next
ठळक मुद्देएजीएम अगरवाल यांच्या हस्ते उद्घाटन : आज पुरस्कार वितरण समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात पहिली रेल्वेगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. ती आठवण जोपासण्यासाठी दरवर्षी १० ते १६ एप्रिल दरम्यान रेल्वे सप्ताह साजरा करण्यात येतो. मध्य रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा या सप्ताहाचे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे. त्यानिमित्त आयोजित तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन मध्य रेल्वेचे अप्पर महाव्यवस्थापक विशाल अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आले. रेल्वे सप्ताहात प्लॅटफार्म क्रमांक ८ वर एका भव्य रेल्वे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी १२ एप्रिलला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
होम प्लॅटफार्मवरील प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता, मुख्य कार्मिक अधिकारी एन. स्वामीनाथन, ‘एडीआरएम’त्रिलोक कोठारी, एन. के. भंडारी, वरिष्ठ ‘सिनिअर डीसीएम’ कुश किशोर मिश्रा, आरपीएफचे कमांडंट ज्योती कुमार सतीजा, मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी, आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, स्टेशन संचालक दिनेश नागदिवे, कार्य निरीक्षक गोपाल पाठक, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील, सेंट्रल रेल्वे मजदुर संघाचे अध्यक्ष वीरेंद्र सिंह, विभागीय संघटक ई. व्ही. राव, प्रवासी सुविधा पर्यवेक्षक प्रवीण रोकडे उपस्थित होते.
माथेरानची टॉय ट्रेन आकर्षणाचे केंद्र
नेरल ते माथेरान दरम्यान पाच डब्यांची टॉय ट्रेन चालते. पर्यटकांमध्ये या ट्रेनविषयी विशेष आकर्षण आहे. या ट्रेनची हुबेहूब प्रतिकृती रेल्वे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. मध्य रेल्वे मुंबईत कार्यरत गार्ड अजय हाते यांनी ही टॉय ट्रेन साकारली आहे. त्यांना बालपणापासूनच रेल्वेविषयी आकर्षण होते. २००२ पासून त्यांनी या कार्याला सुरुवात केली. तीन वर्षात म्हणजे २००४ मध्ये टॉय ट्रेन पूर्ण झाली. या टॉय ट्रेनचे त्यांनी घरीच संचालन केले. त्यानंतर प्रत्येक प्रदर्शनात ही टॉय ट्रेन नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येते.
वाफेचे इंजिन ते सुपरफास्ट रेल्वे
पूर्वी रेल्वेगाडी वाफेच्या इंजिनवर धावायची. आज आधुनिक काळात वाफेचे इंजिन पहावयास मिळत नाही. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा रेल्वेने ठिकठिकाणी जपून ठेवला आहे. जुने वाफेचे इंजिन विविध ठिकाणी रंगरंगोटी म्हणून पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. प्रदर्शनात वाफेचे इंजिन ते सुपरफास्ट रेल्वेचे इंजिन असा प्रवासही नागरिकांनी पाहिला.
आरपीएफ शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन
रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना अनेक प्रकारच्या समस्या येतात. अनेकदा असामाजिक तत्त्वांकडून त्यांना त्रास होतो. अशास्थितीत रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीने रेल्वेगाड्यात जवानांची गस्त लावण्यात येते. हे जवान जवळ शस्त्र घेऊन रेल्वे प्रवाशांना सुरक्षा पुरवितात. प्रदर्शनात रेल्वे सुरक्षा दलाचे जवान वापरत असलेले रिव्हॉल्व्हर, ९ एमएम पिस्तूल, इन्सास ७.६२ एसएलआर आदी शस्त्रे नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.
नागरिकांनी लुटला प्रदर्शनाचा आनंद
प्रदर्शनाच्या दुसऱ्या  दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने होम प्लॅटफार्मवर गर्दी केली. यात नागरिकांना टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर लघुपट, स्लाईड शोच्या माध्यमातून छायाचित्र दाखविण्यात आले. किड्स झोन, फूड कोर्टमध्येही मुलांनी गर्दी केली. प्रदर्शनात स्काऊट आणि गाईडची माहिती देणारा स्टॉल, रेल्वेचा इतिहास सांगणाऱ्या स्टॉलला भेट देऊन नागरिकांनी माहिती जाणून घेतली.

 

Web Title: Nagpur residents have experienced the journey of the steam engine from the steam locomotive to the superfast train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.