सेवानिवृत्त पोलीस हवालदाराने मृत्यूनंतरही बजावले समाजाप्रति कर्तव्य, पत्नी, मुलींनी दिली अवयवदानाची संमती
By सुमेध वाघमार | Published: May 20, 2024 10:17 PM2024-05-20T22:17:14+5:302024-05-20T22:18:09+5:30
Nagpur: कर्तव्यावर असताना पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखावी लागते. नागरिकांना सुरक्षित ठेवणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य असते. याच कर्तव्यातून एका पोलीस हवालदाराच्या कुटुंबाने त्यांच्या मृत्यूनंतरही समाजाचे भान राखत अवयवदान केले. त्यांच्या या दानामुळे तीघांना नवे आयुष्य मिळाले. लवकरच दोघांना दृष्टी मिळणार आहे.
- सुमेध वाघमारे
नागपूर - कर्तव्यावर असताना पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखावी लागते. नागरिकांना सुरक्षित ठेवणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य असते. याच कर्तव्यातून एका पोलीस हवालदाराच्या कुटुंबाने त्यांच्या मृत्यूनंतरही समाजाचे भान राखत अवयवदान केले. त्यांच्या या दानामुळे तीघांना नवे आयुष्य मिळाले. लवकरच दोघांना दृष्टी मिळणार आहे.
चंद्रपूर येथील रहिवासी सेवानिवृत्त पोलीस हवालदार अरुण भटवलकर (६०) त्या अवयवदात्याचे नाव. काही दिवसांपूर्वी घरी असताना अचानक त्यांना उलट्या होऊ लागल्यात. भोवळ येऊन ते खाली पडले. लागलीच त्यांना चंद्रपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती खालवत असल्याचे पाहत त्यांना नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात नंतर तेथून त्यांना न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु उपचारानंतरही त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. डॉक्टरांच्या एका चमूने त्यांची तपासणी करून ‘ब्रेन डेड’ घोषीत केले. याची माहिती त्यांच्या पत्नी मधुरी व पाच मुलींना दिली. सोबतच अवयवदानाविषयी समुपदेशन केले. अचानक झालेल्या या घटनेने त्यांना धक्का बसला. मात्र त्या दु:खातही त्यांचा पत्नी आणि मुलींनी अवयवदानाचा निर्णय घेतला. विभागीय प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) याची माहिती देण्यात आली. त्यांनी प्रतिक्षा यादीनुसार दोन्ही किडनी, यकृत व कॉर्नियाचे दान केले.
६७ वर्षीय रुग्णाला जीवनदान
किडनी निकामी होऊन मृत्यूच्या दाढेत जगणाºया ६७ वर्षीय पुरुष रुग्णाला किडनी दान करून जीवनदान देण्यात आले. दुसरी किडनी न्यू इरा हॉस्पिटलमधील ४३वर्षीय महिलेला दान करण्यात आली. तर यकृत याच हॉस्पिटलमधील ५० वर्षीय पुरुष रुग्णाला दान करण्यात आले. कॉर्निआ मेडिकलला दान करण्यात आले.
आतापर्यंत १५१ ब्रेन डेड व्यक्तीचे अवयवदान
नागपुरात अवयवदानाची चळवळ २०१३पासून सुरू झाली. हे १५१ ‘ब्रेन डेड’ व्यक्तीचे अवयवदान होते. राज्यात नागपूर हे अवयवदानात पुणे, मुंबई नंतर तिसºया क्रमांकावर आले आहे.