Nagpur Riots: नागपूर दंगल प्रकरणी १३ गुन्ह्यांची नोंद; कर्फ्यूमध्ये शिथिलता येण्याची शक्यता
By योगेश पांडे | Updated: March 21, 2025 20:51 IST2025-03-21T20:50:51+5:302025-03-21T20:51:07+5:30
नागपुरातील उपायुक्तांवरील हल्ला व महिला पोलीसांच्या विनयभंगाची चौकशी गुन्हे शाखेकडे

Nagpur Riots: नागपूर दंगल प्रकरणी १३ गुन्ह्यांची नोंद; कर्फ्यूमध्ये शिथिलता येण्याची शक्यता
योगेश पांडे
नागपूर : सोमवारी नागपुरात झालेल्या दंगल प्रकरणात आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यात १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने झालेला हल्ला तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंगाची चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात येणार आहे. तसेच कामठी येथील घटनेशी संबंधित सायबर पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, काही ठिकाणच्या कर्फ्यूमध्ये शिथिलता येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महाल दंगलीदरम्यान हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेल्या मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) चा शहराध्यक्ष फहीम खान शमीम खान यांच्यासह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर सोशल मीडियाद्वारे हिंसाचाराचे उदात्तीकरण करण्याचा आणि इतरांना सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्याचा आरोप आहे. त्याचप्रमाणे त्याचा जुना सहकारी सय्यद अली याच्या सहभागाबाबतदेखील तपास सुरू आहे. सय्यद अली अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला ताब्यात घेतल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो.
शुक्रवारी कडेकोट बंदोबस्त
रमझानचा महिना सुरू असून शुक्रवारच्या नमाजाचे महत्त्व लक्षात घेता तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय शहरातील संवेदनशील ठिकाणीदेखील पोलीस तैनात होते. शहरात शुक्रवारीदेखील शांतता दिसून आली.
कधी उठणार कर्फ्यू ?
महाल-हंसापुरीत पसरलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी शहरातील अकरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावला होता. मात्र, गुरुवारी सकाळी पोलिसांनी नंदनवन व कपिलनगरमधील कर्फ्यू हटविला, तर सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुपारी दोन ते चार या कालावधीत शिथिलता दिली होती. मात्र रात्री सक्करदरा, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, इमामवाडा, सक्करदरा व यशोधरानगर येथील शिथिलता रद्द केली. त्यामुळे सद्यस्थितीत नऊ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू कायम आहे. शांतता प्रस्थापित झाल्याने आता तरी संवेदनशील जागा वगळता इतर ठिकाणचा कर्फ्यू उठवावा अशी मागणी समोर येते आहे.