Nagpur Riots: नागपूरातील 'या' भागातील कर्फ्यू उठविला; पोलिस आयुक्तांचा आदेश

By दयानंद पाईकराव | Updated: March 22, 2025 20:51 IST2025-03-22T20:50:33+5:302025-03-22T20:51:05+5:30

इतर भागात कर्फ्यू लागू, कोतवाली, तहसिल, गणेशपेठमध्ये शिथिलता

Nagpur Riots: Curfew lifted in Some area of Nagpur; Police Commissioner orders | Nagpur Riots: नागपूरातील 'या' भागातील कर्फ्यू उठविला; पोलिस आयुक्तांचा आदेश

Nagpur Riots: नागपूरातील 'या' भागातील कर्फ्यू उठविला; पोलिस आयुक्तांचा आदेश

दयानंद पाईकराव 

नागपूर : महाल येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर १७ मार्चला झालेल्या आंदोलनामुळे झालेल्या दंगलीत तणाव निर्माण होऊन दगडफेक करण्यात आली. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने शहरातील ११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला होता. परंतु शाळकरी विद्यार्थी, व्यापारी यांना होत असलेल्या त्रासामुळे पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६३ (१) (२) (३) नुसार त्यांना मिळालेल्या अधिकाराचा वापर करून शनिवारी सायंकाळी सक्करदरा, इमामवाडा, पाचपावली, शांतीनगर आणि लकडगंजमधील नागरिकांना दिलासा देत या भागातील कर्फ्यू उठविण्याचा आदेश काढला आहे. परंतू इतर भागातील कर्फ्यू सुरुच राहणार असून कोतवाली, तहसिल आणि गणेशपेठमध्ये कर्फ्यू काही प्रमाणात शिथिल करण्यात आला आहे.

या भागातील कर्फ्यू उठविला
पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी शनिवारी २२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजेपासून झोन ३ मधील पाचपावली, शांतीनगर, लकडगंज ठाण्याच्या हद्दीतील आणि झोन ४ मधील सक्करदरा, इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कर्फ्यू उठविण्याचा आदेश काढला आहे.

येथे कर्फ्यू राहणार कायम
पोलिस आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयानुसार झोन ३ मधील कोतवाली, गणेशपेठ, तहसिल, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत व झोन ४ मधील सक्करदरा, इमामवाडा व झोन ५ मधील यशोधरानगर ठाण्याच्या परिसरात कर्फ्यू लागू राहणार आहे.

कोतवाली, तहसिल, गणेशपेठमध्ये शिथिलता
पोलिस आयुक्तांनी झोन ३ मधील कोतवाली, तहसिल आणि गणेशपेठ येथील कर्फ्यूमध्ये शनिवारी २२ मार्च २०२५ च्या सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेदरम्यान शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू रात्री १० वाजेनंतर या भागातील कर्फ्यू पुर्ववत अंमलात राहणार आहे.

यशोधरानगरमधील कर्फ्यू कायम
झोन ५ मधील यशोधरानगरमधील कर्फ्यू पुढील आदेशापर्यंत कायम राहणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

अत्यावश्यक सेवांना कर्फ्यूतून सुट
झोन ३ आणि ५ मधील नमूद पोलिस ठाण्यांकडे येणारे मार्ग कायदा व सुव्यवस्था पाहून बंद करण्याचे अधिकार व आदेश अंमलबजावणी करण्याचे अधिकार नेमण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना राहणार आहेत. कर्फ्यूच्या आदेशाचा भंग करणाऱी व्यक्ती भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ नुसार शिक्षेस पात्र राहणार आहे. परंतू कर्तव्यावर असलेल्या पोलीस आधिकारी/कर्मचारी, शासकीय, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, अत्यावश्यक सेवा व अग्नीशामक दल तसेच विविध विभागाच्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थी व परीक्षेशी संबंधीत व्यक्तींना हा आदेश लागु राहणार नसल्याचे पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Nagpur Riots: Curfew lifted in Some area of Nagpur; Police Commissioner orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.