नागपुरात गुलाब, मोगऱ्याचा सुगंध महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:24 PM2019-05-31T23:24:14+5:302019-05-31T23:26:20+5:30
लग्नसराईच्या धामधुमीमुळे आणि वाढत्या तापमानामुळे विविध प्रकारच्या फुलांच्या किमती वाढल्या असून मोगरा आणि गुलाबाच्या फुलांचा सुगंध अधिकच महागला आहे. झेंडूने तर यंदा दरात चांगली बाजी मारली आहे. सर्व फुलांचा दर रमजान ईदपर्यंत टिकून राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नसराईच्या धामधुमीमुळे आणि वाढत्या तापमानामुळे विविध प्रकारच्या फुलांच्या किमती वाढल्या असून मोगरा आणि गुलाबाच्या फुलांचा सुगंध अधिकच महागला आहे. झेंडूने तर यंदा दरात चांगली बाजी मारली आहे. सर्व फुलांचा दर रमजान ईदपर्यंत टिकून राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.
शुभकार्यांना विविध प्रकारच्या फुलांची गरज भासते. मे महिन्यासह जूनमध्येही लग्नाचे मुहूर्त असल्यामुळे फुलांच्या मागणीत वाढ होत आहे. जादा फुलांची मागणी विक्रेत्यांकडे अगोदरच करावी लागत आहे. कडक ऊन आणि पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे नाजूक फुले कोमेजून जात आहेत. त्यामुळे बाजारात फुलांची आवक कमी असून दरदिवशी आणि तासातासात भाव बदलत असल्याची माहिती अरोमा फ्लॉवरचे संचालक आणि महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
गुलाब व मोगऱ्याला सर्वाधिक मागणी
लग्नसराईत मोगरा, गुलाब, निशिगंधा आणि सजावटीच्या फुलांना सर्वाधिक मागणी असते. गुलाब पुणे, मुक्ताईनगर, धुळे, बेंगळुरू येथून येत आहे. शुक्रवारी २०० ते २५० रुपये किलो भाव होते. पण सर्वाधिक चढउतार मोगऱ्याच्या भावात होत आहे आवक वर्धा रोड आणि नागपूरलगतच्या ४० कि़मी. क्षेत्रातून होते. सिंचनाच्या सोईसुविधा झाल्यामुळे मोगऱ्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे.
शहरात लग्नाची संख्या पाहता मोगऱ्याच्या दरात दर तासाला चढउतार होत आहे. सीताबर्डी येथील महात्मा फुले पुष्प बाजारात बुधवारी मोगरा ४०० ते ६०० रुपये किलो, गुरुवारी घट होऊन २०० ते ३०० रुपये आणि शुक्रवारी पुन्हा वाढ होऊन भाव ४०० रुपयांवर दर स्थिरावले होते. शेतकऱ्यांकडून आवक कमीजास्त असल्याचा भावावर परिणाम होत आहे. मोगऱ्यासोबत निशिगंधा फुलाला मागणी आहे. बुधवारी भाव ७० ते ८० रुपये किलो, गुरुवारी १५० ते २५० रुपये आणि शुक्रवारी १५० रुपयांवर स्थिरावले होते. उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन जमत नसल्यामुळे उत्पादन कमी आहे. शेतकरी बाजारात दरदिवशी कमीजास्त आवक असल्यामुळे भावातही चढउतार होत असल्याचे रणनवरे यांनी स्पष्ट केले.