नागपुरात १० लाख रुपये लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 10:48 AM2018-05-10T10:48:36+5:302018-05-10T10:48:48+5:30
ताजश्री होंडाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करून १० लाख रुपये लुटण्यात आले. बुधवारी रात्री देवनगर येथे ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ताजश्री होंडाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करून १० लाख रुपये लुटण्यात आले. बुधवारी रात्री देवनगर येथे ही घटना घडली. हल्ला करून लुटणारा आरोपी हा ताजश्री होंडातील माजी कर्मचारीच आहे. आपल्या साथीदाराच्या मदतीने त्याने हे कृत्य केले. आरोपी हा माजी कर्मचारी असल्याने पोलीसही सतर्क झाले.
देवनगर येथे ताजश्री होंडाची शोरूम आहे. दिवसभराच्या विक्रीची रक्कम कर्मचारी रात्रीला मालकाच्या घरी नेऊन सोडतात. ताजश्रीचे मालक अविनाश भुते हे समर्थनगरात राहतात. रोज रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान कॅशियर इतर कर्मचाऱ्यांसह रुपये घेऊन जातो.
बुधवारी रात्री ८.३० वाजता ताजश्री होंडाचा कर्मचारी ३२ वर्षीय उमेश पारधी कॅशियरसह दुचाकीने शोरूममधून मालकाच्या घराकडे जाण्यासाठी निघाले. दुचाकीच्या डिक्कीमध्ये १० लाख रुपये ठेवले होते. उमेश दुचाकी चालवत होता तर कॅशियर मागे बसला होता. शोरूमपासून थोड्याच अंतरावर गेले असता शोरुममधील माजी कर्मचारी राहुल कळमकर याने त्यांना थांबवले. राहुल हा पूर्वीचाच कर्मचारी असल्याने उमेशने त्याला गांभीर्याने घेतले नाही. उमेशने त्याला ‘चल हट उशीर होत असल्याचे ’सांगत त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला.
त्याचवेळी राहुल व त्याच्या तीन साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला. चाकूचा धाक दाखवून उमेश व कॅशियरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि दुचाकी हिसकावून फरार झाले. उमेशने लगेच आपल्या वरिष्ठांना माहिती दिली. त्यांनी बजाजनगर पोलिसांना कळविले. घटनास्थळ हे धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने धंतोली पोलिसांना कळविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आरोपीचा शोध सुरू होता.
राहुल हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने ताजश्रीमधून काम सोडले होते.