नागपूर आरटीओने तारीख दिली, पण परीक्षा घेतली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 11:46 AM2019-10-30T11:46:41+5:302019-10-30T11:48:23+5:30

पूर्व नागपुरातील क्षेत्रीय परिवहन कार्यालयात (आरटीओ) सकाळी वाहनाची लर्निंग परीक्षा देण्यासाठी गेलेले जवळपास २०० अर्जदार नाराज झाले.

Nagpur RTO dated, but did not take the exam | नागपूर आरटीओने तारीख दिली, पण परीक्षा घेतली नाही

नागपूर आरटीओने तारीख दिली, पण परीक्षा घेतली नाही

Next
ठळक मुद्देपूर्व नागपुरातून परतले अर्जदाररिशेड्युलिंगसाठी १०० रुपयेदलालीला मिळतेय बळ‘हेल्पलाईन’नेही केली निराशा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व नागपुरातील क्षेत्रीय परिवहन कार्यालयात (आरटीओ) सकाळी वाहनाची लर्निंग परीक्षा देण्यासाठी गेलेले जवळपास २०० अर्जदार नाराज झाले. त्यांना परीक्षेसाठी मंगळवार, २९ ऑक्टोबर ही तारीख देण्यात आली होती. पण कार्यालयाचे गेट बंद होते. त्यामुळे त्यांना परीक्षा न देता रिक्त हस्ते परतावे लागले.
कार्यालयाचे गेट बंद असतानाही परिसरात दलाल पूर्णपणे सक्रिय होते. त्यांनी काही अर्जदारांकडून रिशेड्युलिंगच्या नावाखाली १०० रुपये वसूल केले. परिवहन कार्यालयाच्या अशा कारभारावर अर्जदारांनी नाराजी व्यक्त केली. अर्जदार आॅनलाईन अपॉर्इंटमेंट घेऊन मंगळवारी कार्यालयात पोहोचले. विचारपूस केली असता आज सुटी असल्याचे त्यांना सांगण्यात आले. सुटी आहे मग तारीख का दिली, असा सवाल अर्जदारांनी केला. अनेक अर्जदार सकाळी ११ पासून रांगेत उभे होते. कार्यालयाच्या गेटवर हेल्पलाईन नंबर लिहिला आहे. त्यावर संपर्क साधला असता, त्यांना काहीही मदत मिळाली नाही. उलट त्यांना प्लीज नंबर चेक करावा, असे उत्तर मिळाले. त्यांची समस्या एवढ्यावर संपली नाही. त्यानंतर त्यांना पुन्हा अपॉर्इंटमेंटची कवायत करावी लागली.
कार्यालय तर बंद होते, पण कार्यालयाजवळील एका दुकानात १०० रुपये देऊन अर्जदारांनी परावर्तित तारीख मिळविली. या समस्येवर पूर्व आरटीओच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कॉल उचलला नाही.
एकीकडे मोटर वाहन कायद्याचे नियम कठोर करून दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. यामुळे लोकांचा परवाना स्वत:जवळ बाळगून वाहन चालविण्यावर भर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक जण लर्निंग परवाना घेण्यासाठी परिवहन कार्यालयाकडे धाव घेत आहेत.
डिजिटल इंडियावर भर देण्याच्या काळात आॅनलाईन सिस्टिम योग्यरीत्या काम करीत नसल्याचे दिसून येत आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, सुटीच्या दिवशी अर्जदारांना अपॉर्इंटमेंट का दिली आणि दिल्यानंतरही तारखेपूर्वी त्यांना सुटीच्या दिवशी कार्यालय बंद राहण्याची सूचना का दिली नाही, असे गंभीर सवाल यानिमित्ताने उभे राहिले आहेत.
अर्जदार करताहेत असुविधांचा सामना
परिवहन कार्यालयात अर्जदारांना होणाऱ्या असुविधांचा क्रम नवीन नाही. यापूर्वीही शहर आरटीओ कार्यालयात सर्व्हर ठप्प झाल्याने जवळपास २०० अर्जदारांना परतावे लागले होते. असुविधांमुळे दलालांना कमाईची संधी मिळते. ही शृंखला कार्यालयात आजही कायम आहे. आरटीओ कार्यालयात दाखल होण्यापूर्वीच दलालांचा आवाज अर्जदारांपर्यंत पोहोचतो. यावरून या कार्यालयात भ्रष्टाचार दूरवर पसरल्याची प्रचिती येते.

Web Title: Nagpur RTO dated, but did not take the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.