नागपूर आरटीओ ; बदलीनंतरच्या पदस्थापनेला अधिकारीच मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 09:09 PM2018-06-26T21:09:16+5:302018-06-26T21:10:10+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर, ग्रामीण व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरचे मिळून नऊ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ते आपल्या ठिकाणी रुजूही झाले. परंतु त्यांच्या ठिकाणी अद्याप कुणीच रुजू झालेले नाही. दोन ते तीन महिन्यावर कालावधी होत असतनाही ही पदे रिक्त असल्याने कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले आहे. विशेषत: रस्त्यावरील वाहन तपासणीची मोहीमही थंडावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर, ग्रामीण व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरचे मिळून नऊ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ते आपल्या ठिकाणी रुजूही झाले. परंतु त्यांच्या ठिकाणी अद्याप कुणीच रुजू झालेले नाही. दोन ते तीन महिन्यावर कालावधी होत असतनाही ही पदे रिक्त असल्याने कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले आहे. विशेषत: रस्त्यावरील वाहन तपासणीची मोहीमही थंडावली आहे.
आरटीओ कार्यालयात ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ वेब बेस प्रणाली सुरू झाल्याने नागरिकांना घरी बसून विविधअर्ज भरणे, ई पेमेंट करणे शक्य झाले आहे. यात आरटीओच्या चकरा मारणेही कमी झाले असले तरी प्रत्यक्ष कामासाठी उमेदवारांना कार्यालय गाठावेच लागते. कार्यालयात वाहन परवाना, परमीट, वाहनांचे पासिंग यासह इतरही कामांसाठी शेकडो लोक येतात. त्यांचा समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि कामाच्या पूर्ततेसाठी सर्वात मोठी जबाबदारी सहायक मोटर वाहन निरीक्षकांची असते. आरटीओ कार्यालयाचे ते ‘कणा’ असल्याचेही बोलले जाते. मात्र या अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे आरटीओत आधीच कामाचा बोजवारा उडाला आहे. यातच सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या करून शासनाने बदलीच्या जागांवर कुणीच पाठविले नसल्याने रोजची कामे प्रभावित झाली आहेत. विशेष म्हणजे, प्रलंबित कामांची संख्या वाढली आहे.
शहर कार्यालयात पाच सहायक निरीक्षकांची पदस्थापना नाही
नागपूर शहर आरटीओ कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक सागर पाटील, मंगेश राठोड, अभिजित खरे व संजीवनी चोपडे यांची शासनाच्या विविध आदेशानुसार बदल्या करण्यात आल्या. परंतु त्यांच्या जागेवर कुणीच आले नाही. यातच सहायक मोटार वाहन निरीक्षक मिथुन डोंगरे हे गेल्या महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. यामुळे त्याचेही पद रिक्तआहे.
ग्रामीणमधील तीन तर पूर्व आरटीओतील एक पदही रिक्त
नागपूर ग्रामीण आरटीओतील सहायक मोटार वाहन निरीक्षक किरण डोंगरे, रवींद्र नराडे व वृद्धी चाऊस यांच्या बदल्या झाल्या, परंतु त्यांच्याही जागी कुणीच आले नाही. या दोन कार्यालयाच्या कामकाजाचा व्याप पाहता तातडीने सहायक निरीक्षक देणे आवश्यक असताना तीन महिन्यावर कालावधी लोटूनही सहायक निरीक्षक नेमण्यात आले नाही. यामुळे आता प्रशासनाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.