नागपूर ग्रामीण भागात अवघ्या ५०० रुपयासाठी होतेय जीवघेणी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 05:27 PM2020-04-17T17:27:39+5:302020-04-17T17:31:08+5:30
बँक खातेदारांनी शासनाने खात्यात जमा केलेल्या केवळ ५०० रुपयांची उचल करण्यासाठी बँक शाखामध्ये जीवघेणी गर्दी केली आहे. हा प्रकार सात दिवसापासून सुरू आहे. मात्र, याला ‘ब्रेक’ लावण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.
श्याम नाडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करण्याच्या सूचना केल्या असल्या तरी राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यक्रमांमध्ये आणि गरीब लाभार्थी बँक शाखांमध्ये याची पायमल्ली करीत आहेत. बँक खातेदारांनी शासनाने खात्यात जमा केलेल्या केवळ ५०० रुपयांची उचल करण्यासाठी बँक शाखामध्ये जीवघेणी गर्दी केली आहे. हा प्रकार सात दिवसापासून सुरू आहे. मात्र, याला ‘ब्रेक’ लावण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.
‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदीमुळे मजुरी करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना शासनासह विविध सामाजिक संघटनांच्यावतीने मदतही केली जात आहे. याच काळात केंद्र शासनाने नागरिकांच्या जनधन खात्यात प्रत्येकी ५०० रुपये जमा केले आणि या रकमेची उचल करण्यासाठी खातेदारांनी कशाचीही पर्वा न करता बँकेकडे धाव घेतली. दुसरीकडे, या रकमची वेळीच उचल न केल्यास ती परत जाईल, अशा अफवाही पसरविण्यात आल्या. या अफवांच्या मुळाशी नेमके कोण आहे, याचा तपास करण्याच्या भरीस कुणी पडत नाही.
बहुतांश जनधन खाती देवाणघेवाण न केल्याने ती पूर्वीच ‘इन अॅक्टिव्ह’ झाली आहेत. त्यामुळे बँक कर्मचारी ही खाती वेळेवर ‘केवायसी’ करीत ‘अॅक्टिव्ह’ करीत आहेत. या प्रक्रियेत प्रत्येकी १५ ते २० मिनिट जात असून बँक कर्मचाऱ्यांना ‘इंटरनेट स्पीड‘ व ‘सर्व्हर डाऊन’च्या समस्येचा सामना करावा लागत आहे. उन्हामुळे खातेदारांचेही हाल होत आहे. त्यांना साधे पिण्याचे पाहणीही मिळत नाही. हा प्रकार तालुक्यातील नरखेडसह मोवाड, सावरगाव, जलालखेडा, थडीपवनी, भारसिंगी, लोहारीसावंगा, भिष्णूर व इतरही ठिकाणच्या बँक शाखांमध्ये दिसून येतो. काही शाखांसमोर पेन्डॉल तयार केले आहेत.
दार बंद करून कामकाज
या गर्दीत इतर खातेदार, शेतकरी, निवृत्ती वेतनधारक व व्यापाऱ्यांनीही भर टाकली आहे. गर्दी टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी बँकांचे दार बंद करून कामकाज करणे सुरू केले आहे. दारातून कर्मचाऱ्याला पासबुक, विड्रॉवल स्लिप दिली जाते. विशेष म्हणजे, जनधन, निवृत्तीवेतन व काही शासकीय योजनांच्या खातेदारांना एटीएम कार्ड दिले जात नाही. शिवाय, तालुक्यातील ९० टक्के एटीएममध्ये अलीकडच्या काळात रक्कम भरली नाही.
बँक कर्मचाऱ्यांचे ‘अप-डाऊन’
नरखेड तालुक्यातील प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. ते रोज नागपूर शहरातून खासगी वाहनांनी शाखांमध्ये ये-जा करतात. या काळात ते अनेकांच्या संपर्कात येतात. त्यात कोण कोरोनाबाधित आहे, याची माहिती त्या कर्मचाऱ्यांनाही नसते. सध्या तालुक्यात एकही कोरोनाबाधित किंवा संशयित नाही. परंतु, बँक कर्मचाऱ्यांचा हा प्रवास खातेदारांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी धोकादायक ठरू शकतो.