नागपूर ग्रामीणमधील कोरोना मृत्यूचे ‘ऑडिट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 08:59 PM2020-11-07T20:59:05+5:302020-11-07T21:01:00+5:30
corona death 'audit' in Nagpur rural ग्रामीणमधील १३ तालुक्यांमध्ये ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक होते. त्या मागील कारणे शोधण्यासाठी, डॉक्टरांच्या चुकांचा व आवश्यक सोयींचा अभ्यास करण्यासाठी ‘डेथ ऑडिट’ म्हणजे मृत्यूचे विश्लेषण केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीणमधील १३ तालुक्यांमध्ये ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक होते. त्या मागील कारणे शोधण्यासाठी, डॉक्टरांच्या चुकांचा व आवश्यक सोयींचा अभ्यास करण्यासाठी ‘डेथ ऑडिट’ म्हणजे मृत्यूचे विश्लेषण केले जात आहे. आतापर्यंत झालेल्या विश्लेषणात विशेषत: ५० वर्षांवरील रुग्णांच्या मृत्यूमध्ये अनियंत्रित जुना आजार व रुग्णालयात येण्यास उशीर हे या मागचे मुख्य कारण ठरल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
ग्रामीणमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद ३० मे रोजी हिंगणा तालुक्यात झाली. जुलै महिन्यात किरकोळ नोंद असताना ऑगस्ट महिन्यापासून मृत्यूसत्राला सुरुवात झाली. कोविडच्या आठ महिन्याच्या काळात ग्रामीणमधील १३ तालुक्यांमध्ये ५७९ रुग्णांचे मृत्यू झाले. यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक मृत्यू झाले. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून मृत्यूची संख्या कमी होऊ लागली. ३१ ऑक्टोबर रोजी व ५ नोव्हेंबर रोजी शून्य मृत्यूची नोंद झाली. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला. झालेल्या मृत्यूचे ‘डेथ ऑडिट’ करण्यासाठी उपसंचालक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनात व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली. ही समिती कोविडमुळे मृत्यूचे विश्लेषण करीत आहे. यासाठी आतापर्यंत सर्व रुग्णालयात झालेल्या मृत्यूचा सविस्तर अहवाल मागविला जात आहे. दगावलेल्या रुग्णाची येतानाची कशी स्थिती होती, दाखल झाल्यावर त्याच्या प्रकृतीत काय बदल झाले. पायाभूत सोयी उपलब्ध होत्या काय, याचा अभ्यास करून अहवाल सादर केला जात आहे.
५० वर्षांवरील रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू
ग्रामीण भागात ५० वर्षांवरील रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, यातील बहुसंख्य रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकाराची समस्या, मूत्रपिंडांचा आजार, यकृताचा आजार व श्वसनविकाराशी संबंधित आजार होते. यातच लक्षणे दिसूनही उशिरा हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या आणि जुना अनियंत्रित आजार असलेल्या रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण मोठे आहे.