नागपूर ग्रामीणचे नवे एसपी राकेश ओला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 01:14 AM2018-07-29T01:14:18+5:302018-07-29T01:15:50+5:30
नागपूर ग्रामीणचे नवीन एसपी (पोलीस अधीक्षक) म्हणून राकेश ओला यांची नियुक्ती झाली आहे. सोमवारी ते आपल्या जबाबदारीची सूत्रे स्वीकारू शकतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर ग्रामीणचे नवीन एसपी (पोलीस अधीक्षक) म्हणून राकेश ओला यांची नियुक्ती झाली आहे. सोमवारी ते आपल्या जबाबदारीची सूत्रे स्वीकारू शकतात.
कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि हसतमुख अधिकारी म्हणून राकेश ओला यांनी वर्षभरात नागपुरात आपली प्रतिमा तयार केली आहे. २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले ओला सरळ सेवा भरतीने सहायक पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले होते. सप्टेंबर २०१४ मध्ये अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूरला त्यांना सर्वात पहिली नियुक्ती मिळाली. त्यावेळी तोतया पोलीस बनून लोकांना लुटणाऱ्या इराणी टोळीने अहमदनगरसह संपूर्ण राज्यात हैदोस घातला होता. या टोळीचा त्यांनी छडा लावून टोळीचे कंबरडे मोडले. मे १६ मध्ये त्यांची तेथून मालेगावला अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली. जातीय दंगलीची पार्श्वभूमी असलेल्या मालेगावात त्यांनी मे २०१७ पर्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली. तेथून ते जून २०१७ ला नागपुरात पोलीस उपायुक्त म्हणून बदलून आले. येथे त्यांना परिमंडळ दोनची जबाबदारी देण्यात आली. नागपूर, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये तोतया पोलीस बनून लुटणाऱ्या टोळीचा तसेच कारची काच फोडून रोकड आणि मौल्यवान चिजवस्तूंची बॅग लंपास करणाऱ्या टोळीचा त्यांनी छडा लावला. याशिवाय अनेक गंभीर गुन्ह्यांचाही छडा लावण्यात त्यांनी महत्त्वाची भूमीका वठविली. कोणत्याही स्थितीत शांतपणे आणि हसतमुख काम करण्याची त्यांची शैली त्यांना ‘कुल आॅफिसर’ म्हणून ओळख देऊन गेली आहे. शुक्रवारी रात्री जारी झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीच्या यादीत त्यांचेही नाव असून, सरकारने त्यांना नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती दिली आहे. हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ग्रामीणमध्ये कोळसा आणि वाळू तस्करी हे दोन प्रमुख आव्हानं त्यांच्यापुढे आहे. कोळसा माफिया आणि वाळू तस्करांचे ते कंबरडे मोडतील, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा आहे.