रेतीतस्करांना नागपूर ग्रामीण पोलिसांचा दणका : १९ ट्रकसह ५ कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 08:25 PM2019-06-28T20:25:32+5:302019-06-28T20:26:50+5:30
पावसाळ्यात रेतीचा उपसा करणे शक्य नसल्याने रेतीतस्करांनी पावसाच्या दडीचा फायदा घेत सावनेर तालुक्यातील काही रेतीघाटांना लक्ष्य केले. त्यातच गुरुवारी मध्यरात्री नागपूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान नदीवरील वाकी रेतीघाटात धाड टाकत रेतीवाहतुकीचे १६ ट्रक पकडले. त्याच काळात सावनेर पोलिसांनी पाटणसावंगी - धापेवाडा मार्गावर कारवाई करीत रेतीची वाहतूक करणारे तीन ट्रक पकडले. या दोन्ही कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण १९ ट्रक व एक जेसीबी मशीन पकडली असून, ५ कोटी ११ लाख ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे रेतीचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (सावनेर/पाटणसावंगी) : पावसाळ्यात रेतीचा उपसा करणे शक्य नसल्याने रेतीतस्करांनी पावसाच्या दडीचा फायदा घेत सावनेर तालुक्यातील काही रेतीघाटांना लक्ष्य केले. त्यातच गुरुवारी मध्यरात्री नागपूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान नदीवरील वाकी रेतीघाटात धाड टाकत रेतीवाहतुकीचे १६ ट्रक पकडले. त्याच काळात सावनेर पोलिसांनी पाटणसावंगी - धापेवाडा मार्गावर कारवाई करीत रेतीची वाहतूक करणारे तीन ट्रक पकडले. या दोन्ही कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण १९ ट्रक व एक जेसीबी मशीन पकडली असून, ५ कोटी ११ लाख ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे रेतीचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कन्हान नदीच्या वाकी घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात असल्याची माहिती कन्हानचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी खाप्याचे ठाणेदार हर्षल येकरे यांच्यासह सहकाऱ्यांना सोबत घेऊन या परिसराची मध्यरात्री पाहणी केली. त्यावेळी त्यांना घाटात १६ ट्रक आणि त्यात पोकलॅण्ड व जेसीबी मशीनद्वारे रेती भरली जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ धाड टाकली.
या धावपळीत अंधाराचा फायदा घेत चालकांनी पोकलॅण्ड मशीन व काही ट्रक घेऊन पळ काढला. मात्र, १६ ट्रक त्यांच्या हाती लागले. यातील एमएच-४०/बी-७१७६, एमएच-४०/बीजी-५०३६, एमएच-४०/एके-६८७४, एमएच-४०/-डीएस-१८१५, एमएच-४०/वाय-७१७१, एमएच-२७/बीएक्स-३०६० व एमएच-२७/बीएक्स-२९६० या सात ट्रकमध्ये प्रत्येकी पाच ब्रास रेती भरली असल्याचे तसेच एमएच-४०/बीएल-८६९८, एमएच-४०/बीजी-७८२३, एमएच-४०/बीजी-९९००, एमएच-४०/बीजी-९८९९, एमएच-४०/बीएल-२२५०, एमएच-४०/बीजी-७५९४, एमएच-४०/बीजी-९५४१, एमएच-४०/बीजी-८६९८ व एमएच-४०/एके-२१८६ हे नऊ ट्रक रेती भरण्याच्या प्रतीक्षेत उभे असल्याचे आढळून आल्याने या सर्व ट्रकसह एमएच-४०/पी-३१३७ क्रमांकाची जेसीबी जप्त केली.
शिवाय, या ट्रक्सचे चालक सुनील कोकोडिया, दिनेश येसने, राजकुमार भावरकर, अनिल कुंभरे, अजय ठाकूर, आकाश गायबोले, संग्राम थिवरे, स्वप्नील बावणे, कैलास उके, नाना मडावी, श्रीराम राऊत, सोनू चपडिया, गणेश गजभिये, मुकेश भलावी, संतोष वाघाडे, कैलास उईके यांच्यासह ट्रक व जेसीबी मालकांविरुद्ध गुन्हा नोंदविला. शिवाय, त्यांच्याकडून ४ कोटी ४५ लाख रुपये किमतीचे १६ ट्रक व एक जेसीबी आणि ७० हजार रुपये किमतीचा ३५ ब्रास रेती असा एकूण ४ कोटी ४६ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दुसरीकडे, याचवेळी सावनेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पाटणसावंगी - धापेवाडा मार्गावरील कोलार नदीपरिसरात कारवाई करीत रेतीची अवैध वाहतूक करणारे एमएच-२७/बीएक्स-११९९, एमएच-४०/एके-७२९९ व एमएच-४०/एके-४७६२ क्रमांकाचे तीन ट्रक पकडले. यात ट्रकचालक धीरज घोगरे, रा. वलगाव, जिल्हा अमरावती, कुंदन गव्हाणे, रा. पिपळा, ता. नरखेड व मंगेश लोणारे, रा. इसापूर, ता. सावनेर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. शिवाय, त्यांच्याकडून एकूण १३ ब्रास रेतीसह ६५ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी खापा व सावनेर पोलिसांनी ट्रक चालक व मालकांविरुद्ध भादंवि ३७९, १०९, १८८ अन्वये गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
नियमबाह्य उपसा व वाहतूक
वाकी घाटात केलेल्या कारवाईमध्ये एसडीपीओ संजय पुजलवार यांनी ट्रकचालकांना बारकाईने विचारपूस केली. त्यात त्यांच्याकडे रेती उपसा करण्याची तसेच वाहतुकीची रॉयल्टी नसल्याचे निदर्शनास आले. एवढेच नव्हे तर एका रॉयल्टीवर ट्रकच्या किमान १० फेऱ्या केल्या जात असल्याचेही उघड झाले. कोणत्यातीही घाटात सूर्यास्तापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत रेतीच्या उपसा व वाहतुकीवर बंदी घालण्यात आली असली तरी, रॉयल्टीसोबतच याही नियमाची पायमल्ली केली जात असल्याचे उघड झाले.
महसूल विभाग गप्प
ही कारवाई मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सुरूच होती. शिवाय, सकाळी या कारवाईची माहिती महसूल विभागातील कोतवालापासून तर तहसीलदारांपर्यंत सर्वांनाच झाली होती. सावनेर तालुक्यात एकूण २७ रेतीघाट असून, त्यातील आठ घाटांचा लिलाव झाला आहे. कोणत्या घाटातून कोण, किती व कधी रेतीची उचल करते, त्या रेतीची कोणत्या मार्गाने कुठे व कशी वाहतूक केली जाते, याबाबत महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना इत्यंभूत माहिती असते. मात्र, महसूल विभागातील एकाही अधिकाऱ्याने दिवसभर ही कारवाई गांभीर्याने घेतली नाही. शेवटी पोलिसांनाच फिर्यादी होऊन तक्रारी नोंदवाव्या लागल्या.
जिल्ह्यातील अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर आहे. ‘नाईट पेट्रोलिंग’ आणि नाकाबंदीच्या माध्यमातून रेतीतस्करांच्या हालचालींवर पोलीस ‘वॉच’ ठेवून आहेत. सावनेर तालुक्यात गुरुवारी मध्यरात्री करण्यात आलेली कारवाई गुप्त माहितीच्या आधारावर करण्यात आली. भविष्यातही अशाच प्रकारच्या कारवाई करून रेतीतस्करांवर अंकुश लावण्यासाठी प्रयत्न केले जाईल.
राकेश ओला,
पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण.