नागपूरकर म्हणतात,फाशीची शिक्षा आवश्यकच
By admin | Published: September 4, 2015 02:54 AM2015-09-04T02:54:54+5:302015-09-04T02:54:54+5:30
मृत्युदंडाची शिक्षा हवी की नको, याबाबत देशासोबतच जगभरात चर्चा सुरू आहेत.
नागपूर : मृत्युदंडाची शिक्षा हवी की नको, याबाबत देशासोबतच जगभरात चर्चा सुरू आहेत. नागपुरातदेखील याबाबत विविध मतं दिसून येत असली तरी बहुसंख्य लोक फाशीच्या शिक्षेच्या समर्थनार्थ असल्याची बाब समोर आली आहे. तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाने फाशीची शिक्षा हवी की नको, या विषयावर नागपूर शहरातील नागरिकांचे मत जाणून घेतले. या सर्वेक्षणानुसार ६८ टक्के नागरिकांनी फाशीची शिक्षा आवश्यक असल्याचे मत नोंदविले आहे.
संपूर्ण जगभरात मृत्युदंड हा विषय विवादास्पद राहिलेला आहे. अनेक प्रमुख देशांमध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी अणण्यात आली आहे. भारताच्या विधी आयोगाच्या समितीने दहशतवाद वगळता इतर बाबींसंदर्भात फाशीच्या शिक्षेची तरतूद रद्दबातल करण्याची शिफारस विधी व न्याय मंत्रालय तसेच सर्वोच्च न्यायालयाला केली. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले. १७ ते २४ आॅगस्ट या कालावधीत प्राचार्य डॉ. केशव पाटील यांच्या मार्गदर्शनात ४९ विद्यार्थी व १४ शिक्षक या प्रक्रियेत सहभागी झाले होते. फाशीची शिक्षा हवी की नको, कायम ठेवायची असल्यास त्यामागील कारणे आणि बंदी आणायची असल्यास त्यामागील कारणे, याबाबत नागरिकांना विचारणा करण्यात आली होती. या सर्वेक्षणानुसार ६८.४३ टक्के नागरिकांनी फाशीच्या शिक्षेचे समर्थन केले आहे. २५.७० टक्के नागरिक हे या शिक्षेच्या विरोधात असून, ५.८७ टक्के लोकांना नेमके मत मांडता आले नाही. (प्रतिनिधी)
गुन्हेगारांवर जरब बसावी
समाजात घडणारे गुन्हे कमी व्हावेत व गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण व्हावी, यासाठी फाशीची शिक्षा आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. ३१.५६ लोकांना मात्र फाशीची शिक्षा नेमकी का हवी, याबाबत ठोस मत मांडता आले नाही. फाशीचा विरोध करणाऱ्यांपैकी ५० टक्के नागरिकांच्या मते, गुन्हेगाराला सुधारण्याची संधी दिली गेली पाहिजे, तर ३२.९५ टक्के नागरिकांनी फाशी ही हत्याच असल्याचे मत नोंदविले. १७.०५ टक्के नागरिकांनी कुठलेही मत व्यक्त केले नाही.