नागपुरात ३८ लाख ४७ हजारांचा विक्रीकर बुडवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 09:21 PM2018-07-31T21:21:15+5:302018-07-31T21:26:02+5:30
आठ कोटी आठ लाखांचा आर्थिक व्यवहार करून ३८ लाख ४७ हजारांचा विक्रीकर चुकविणाऱ्या कंपनी मालकाविरुद्ध कळमना पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आठ कोटी आठ लाखांचा आर्थिक व्यवहार करून ३८ लाख ४७ हजारांचा विक्रीकर चुकविणाऱ्या कंपनी मालकाविरुद्ध कळमना पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मनीष दिनेश चव्हाण (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा मयूरनगर, मुखाखेडी, इंदूर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहे.
चव्हाण गेल्या काही वर्षांपासून नागपुरातील भांडेवाडीतील भोलानगरात राहतो. तो क्रिष्णा आॅर्गेनिक फार्मिंगचा मालक आहे. यवतमाळच्या तिलक मार्ग मंदिरजवळ राहणारे जितीश चिरंजीलाल मित्तल (वय ३४) यांच्यासोबत आरोपी चव्हाणची व्यावसायिक ओळख होती. सध्या मित्तल भटिंडा, पंजाबमध्ये राहतात. मित्तल आणि चव्हाण यांच्यात सन २०११ ते २०१३ या कालावधीत ८ कोटी ८ लाख ७९८ रुपयांच्या कापूस खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला. ही संपूर्ण रक्कम मित्तल यांच्याकडून चव्हाणने घेतली. महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायद्यानुसार त्यांना पक्के बिल देणे बंधनकारक होते, मात्र चव्हाणने पक्के बिल दिले नाही. एवढेच नव्हे तर विक्रीकराची ३८ लाख ४७ हजार ६५८ रुपयांची रक्कम शासकीय कोषागारात जमा न करता स्वत:च लाटली. चव्हाणने विश्वासघात करून फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने मित्तल यांनी कळमना पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल केला. आरोपीची चौकशी सुरू असल्याचे कळमना पोलिसांनी सांगितले.