Nagpur: संघ आणि शिवसेना एकच...शिंदेसेनेच्या आमदारांचे ‘संघ दक्ष’
By योगेश पांडे | Updated: December 20, 2024 00:04 IST2024-12-20T00:03:49+5:302024-12-20T00:04:14+5:30
Magpur News: विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपच्या आमदारांसोबत शिवसेनेचे आमदार व नेतेदेखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. दोन वर्षे संघस्थानी गेल्यावर काहीसे जपून व्यक्त होणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये संघस्तुतीबाबत चढाओढच लागली होती.

Nagpur: संघ आणि शिवसेना एकच...शिंदेसेनेच्या आमदारांचे ‘संघ दक्ष’
- योगेश पांडे
नागपूर - विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपच्या आमदारांसोबत शिवसेनेचे आमदार व नेतेदेखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. दोन वर्षे संघस्थानी गेल्यावर काहीसे जपून व्यक्त होणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये संघस्तुतीबाबत चढाओढच लागली होती. विधानसभा निवडणुकीच्या निकालांत संघशक्तीचा अनुभव मिळाल्यामुळेच शिवसेनेच्या अनेक आमदारांनी संघ जाणून घेण्याची इच्छा प्रदर्शित केली. तर मोठ्या नेत्यांनी संघ व शिवसेना एकच असल्याचा दावा केला.
मागील दोन वर्षांपासून शिंदेसेनेचे आमदार संघस्थानी येत आहेत. मात्र तेथे आल्यावर त्यांनी जपूनच प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र यावेळी आमदारांमध्ये कधी नव्हे तेवढा उत्साह दिसून आला. विशेष म्हणजे कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात संघापासून अंतर ठेवणाऱ्या सदस्यांनीदेखील संघस्थानी गेल्यावर मी संघाच्या किती जवळ आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला.
शिंदेंचा दावा, माझी सुरुवात संघाच्या शाखेपासूनच
मी याअगोदरदेखील रेशीमबागेत आलो असून समाधिस्थळाचे दर्शन घेतले आहे. संघ परिवाराचे माझे लहानपणापासून संबंध आहे. संघाच्या शाखेमधूनच माझी सुरुवात झाली आहे. नंतर मी शिवसेनेच्या शाखेत गेल्यानंतर बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांचे विचारांची शिकवण घेतली. संघ आणि शिवसेनेचे विचार एकसारखे आहेत. निरपेक्ष भावनेने कसे काम केले पाहिजे हे संघ परिवाराकडून शिकावे. कुठलीही प्रसिद्धीची भावना न ठेवता संघाचा स्वयंसेवक काम करत असतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
उपसभापती म्हणाल्या, माझ्या मातृभूमीवरच आल्यासारखे वाटले
चळवळीतून समोर आलेल्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संघस्थानी आल्यावर माझ्या भूमीवरच आल्याची भावना व्यक्त केली. माझा संघ परिचय नव्हता, मात्र विचारांशी ओळख होती. वस्तू बनवण्याचे कारखाने असतात, मात्र संघ म्हणजे माणसे घडविणारी यंत्रणा आहे. संघ काही करणार नाही, मात्र स्वयंसेवक काहीही सोडणार नाही ही संघाची भूमिका आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखीच आक्रमक वाटली. त्यामुळे मला मी माझ्या मातृभूमीवर आल्यासारखेच वाटल्याची भावना गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
मंत्र्यांची भावना, संघ-शिवसेना वेगळेच नाहीच
२०१९ ते २०२२ या कालावधीत सत्तेवर असताना शिवसेनेच्या बऱ्याच नेत्यांनी संघाविरोधात भूमिका मांडत अंतर ठेवले होते. मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत अनेकांचे विचार बदलले आहेत. संघाने निवडणुकीत मौैलिक भूमिका पार पाडली आहे. संघ आणि शिवसेना वेगळे नाहीत, असे प्रतिपादन मंत्री दादा भुसे यांनी केले. बाळासाहेब ठाकरे आणि संघाचे विचार सारखे होते. आम्हाला इथे आल्यानंतर कुठेही वेगळ्या ठिकाणी आलो असे जाणवत नाही. अजित पवारांनादेखील येथे येण्यास काही हरकत नसली पाहिजे, अशी भावना मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. आम्ही संघस्थानी नेहमीच येत असतो व पुढेदेखील येत राहू, असे मंत्री संजय राठोड म्हणाले.