Nagpur: नायलॉन मांजाने पतंग उडविणाऱ्यांवर ‘संक्रांत’, पोलिसांनी दाखल केले गुन्हे

By योगेश पांडे | Published: January 14, 2024 10:53 PM2024-01-14T22:53:22+5:302024-01-14T22:54:44+5:30

Nagpur: मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी रविवार आल्याने पतंग उडविणाऱ्यांमध्ये उत्साह होता. मात्र नायलॉन मांजाने पतंग उडविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी शोधमोहीम राबविली. शहरातील काही अतिउत्साही तरुण पोलिसांच्या तावडीत गवसले व त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Nagpur: 'Sankranta', police register cases against those who fly kites with nylon manja | Nagpur: नायलॉन मांजाने पतंग उडविणाऱ्यांवर ‘संक्रांत’, पोलिसांनी दाखल केले गुन्हे

Nagpur: नायलॉन मांजाने पतंग उडविणाऱ्यांवर ‘संक्रांत’, पोलिसांनी दाखल केले गुन्हे

- योगेश पांडे  
नागपूर - मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी रविवार आल्याने पतंग उडविणाऱ्यांमध्ये उत्साह होता. मात्र नायलॉन मांजाने पतंग उडविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी शोधमोहीम राबविली. शहरातील काही अतिउत्साही तरुण पोलिसांच्या तावडीत गवसले व त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय नायलॉनची विक्री करणाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात आली.

पाचपावली पोलीस ठाण्याच्या पथकाने नायलॉन मांजाने पतंग उडविणाऱ्या मिलींद नगर येथील विनेश गणेश राऊत (२७) व राहुल खुदीराम करमकार (२८) यांच्याविरोधात कारवाई केली. ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबागमध्ये विक्रांत उर्फ पांड्या संजय गायकवाड (२३, रामबाग) यावक नायलॉन मांजाने पतंग उडविताना कारवाई करण्यात आली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओमनगरात सुखबीरसिंग उर्फ विक्की दिलबागसिंग राजपूत (२३) याला पतंग उडविताना पकडण्यात आले. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंजीपेठेत मयंक संतोष यादव (२२) याला नायलॉन मांजाने पतंग उडविताना रंगेहाथ पकडण्यात आले. तर भालदारपुरा येथे शेख शाहरूख (२४) हादेखील नायलॉन मांजाने पतंग उडविताना आढळला. पोलिसांनी या कारवायांमध्ये १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

यशोधरानगर येथील विनोबा भावे नगर येथील कमलाकर विजय हेडाऊ याच्या घरावर गुन्हे शाखेच्या युनिट-५ ने छापा टाकून नायलॉन मांजा जप्त केला. तर पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विष्णू पुरे (सोनबाजीनगर) याच्या दुकानात धाड टाकली असता तेथे रामबाबु प्रेमालाल नैकेले (४०, टिमकी, तीनखंबा) हा नायलॉनची विक्री करताना आढळून आला. त्याच्यासोबत अमीत पौनिकर (इतवारी, खपरी मोहल्ला) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन फुटाळा येथे जानकीप्रसाद सूरजलाल गुप्ता (४५) याच्याकडून विक्रीसाठी ठेवलेला नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. तर गोंडटोली तेलंगखेडी येथील कलीम कबाडीच्या दुकानात धाड टाकली असता तेथे टिमकीतील फईम सलीम बक्ष (२३) व अब्दुल कलीम अब्दुल जब्बार (३८) टिमकी, तहसील हे दोघे मांजा विकताना आढळले.

गच्चीवर डीजे वाजवणाऱ्यांवरदेखील होणार कारवाई
पतंगबाजीच्या नावाखाली गच्चीवर डीजे वाजवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत. पतंगबाजीच्या नावाखाली कोणीही अश्लीलता आणि ध्वनी प्रदूषण पसरवू शकत नाही. नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. इतर नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन पतंग उडवा, अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या भागात सतत गस्त घालण्यास सांगण्यात आले आहे. ड्रोनच्या मदतीने लक्ष ठेवून नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Nagpur: 'Sankranta', police register cases against those who fly kites with nylon manja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.