नागपुरात शाळकरी मुलाचा तलावात बुडून करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:09 AM2018-05-25T01:09:23+5:302018-05-25T01:09:46+5:30
मित्रांसोबत पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा तलावात बुडून करुण अंत झाला. घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी दुपारी घडलेली ही घटना कुणालाही सांगितली नाही. रात्री उशिरा पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर या दुर्घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा तलावात बुडून करुण अंत झाला. घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी दुपारी घडलेली ही घटना कुणालाही सांगितली नाही. रात्री उशिरा पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर या दुर्घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला.
विनीत दिनेश निखाडे (वय १२) असे मृताचे नाव असून तो सोमलवाडा हायस्कूलमध्ये ५ वीत शिकत होता. तो खामल्यातील शिवनगरात राहत होता, अशी माहिती आहे. विनित आणि त्याच्या मित्रांनी गुरुवारी दुपारी सोनेगाव तलावात अंघोळीला जाण्याचा बेत ठरवला. पोहता येत नसताना देखील ते तलावाच्या काठावर पोहचले. खोलगट भागात चिखल असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. अचानक विनीत पाण्यात बुडू लागला. त्यामुळे घाबरलेले त्याचे मित्र तेथून सटकले. त्यांनी आपापल्या घरी जाऊन गप्प बसणे पसंत केले. रात्र झाली तरी विनीत घरी परतला नाही. त्यामुळे चिंताग्रस्त पालकांनी त्याची शोधाशोध सुरू केली. विनीत कुठेच आढळला नाही. त्यामुळे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी लगेच माहिती काढणे सुरू केले. तो ज्या मित्रांसोबत होता, त्यांना बोलवून विचारपूस केली. तेव्हा त्यातील एकाने विनीत तलावात बुडाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने विनीतचा मृतदेह रात्री ११ वाजता बाहेर काढला. वृत्त लिहिस्तोवर प्रकरणाची चौकशी सुरू होती.