नागपुरात स्कूलबस, व्हॅनच्या शुल्कात १० टक्क्याने वाढ : पालकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 08:26 PM2019-06-11T20:26:17+5:302019-06-11T20:27:58+5:30

नवीन शैक्षणिक वर्षात आधीच शालेय साहित्य व पुस्तकांच्या शुल्काने पालकांचे कंबरडे मोडले आहे, आता यात स्कूलबस व व्हॅनच्या भरमसाट शुल्काची भर पडली आहे. नागपुरात विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर ८ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. केवळ आठ किलोमीटरच्या अंतरासाठी स्कूलबससाठी दरमहा सुमारे १९०० तर स्कूलव्हॅनसाठी १५०० रुपये मोजावे लागणार आहे. ऑटोरिक्षाचे दर किलोमीटरनुसार ठरते, तर स्कूल बसचे का नाही, असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

Nagpur school bus, van fee up 10 pc increase: Parental robbery | नागपुरात स्कूलबस, व्हॅनच्या शुल्कात १० टक्क्याने वाढ : पालकांची लूट

नागपुरात स्कूलबस, व्हॅनच्या शुल्कात १० टक्क्याने वाढ : पालकांची लूट

googlenewsNext
ठळक मुद्देऑटोरिक्षाचे भाडे ठरते, स्कूलबसचे का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवीन शैक्षणिक वर्षात आधीच शालेय साहित्य व पुस्तकांच्या शुल्काने पालकांचे कंबरडे मोडले आहे, आता यात स्कूलबस व व्हॅनच्या भरमसाट शुल्काची भर पडली आहे. नागपुरात विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर ८ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. केवळ आठ किलोमीटरच्या अंतरासाठी स्कूलबससाठी दरमहा सुमारे १९०० तर स्कूलव्हॅनसाठी १५०० रुपये मोजावे लागणार आहे. ऑटोरिक्षाचे दर किलोमीटरनुसार ठरते, तर स्कूल बसचे का नाही, असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरात सुमारे ८०० स्कूल बसेस आणि एक हजार स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांची ने-आण होते. हा आकडा आरटीओचा आहे, मात्र शहरात दोन हजारापेक्षा जास्त स्कूल व्हॅन व १००वर अवैध बसेस धावत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करणाऱ्या स्कूलव्हॅन व बससाठी विशिष्ट नियमावली आहे. परंतु सर्वच नियमांचे पालन करतात असे नाही. स्कूलबसच्या तपासणीलाही फारसे गंभीरतेने घेतले जात नाही. क्षमतेच्या दुप्पट विद्यार्थी घेऊन ही दोन्ही वाहने रस्त्यावरून धावतात. विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिली असून आता मनमानी शुल्काकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने पालक चिंतेत आहे.
बसमध्ये २०० ते ४०० रुपयांची वाढ
एका खासगी शाळेमूधन स्कूलबस चालविणाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, पेट्रोल, डिझेलचा दर आता स्थिर राहिलेला नाही. स्कूलबसच्या देखभालीचा, पार्किंगचा खर्च वाढला आहे. याचबरोबर स्कूलबससाठी विशेष नियमावलीचे पालन करावे लागते. यामुळे खर्चात किती तरी टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य सेवासुविधा देण्यासाठी बदल केले आहेत. त्यामुळे या वर्षी २०० ते ४०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
व्हॅनमध्ये १०० ते २०० रुपयांनी वाढ
शहरात सात ते आठ किलोमीटर अंतरासाठी स्कूल व्हॅनचालक गेल्या वर्षी दरमहा १४०० ते १५०० रुपये आकारत होते, आता यात १०० ते २०० रुपयांनी वाढ केली आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक स्कूलव्हॅन या १५ वर्षांवरील आहे, तर काही जादा फेऱ्या करण्यासाठी बेलगाम धावतात.
स्कूलबस व स्कूलव्हॅन उन्हाळ्यासह दिवाळी व नाताळाच्या सुट्यांचेही भाडे वसूल करते. विशेषत: मे महिन्यात शाळा बंद होत्या. तरीही या महिन्याचे शुल्क जबरीने आकारण्यात आल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे, सुट्यांच्या दिवसांचे शुल्क आकारले जात असले तरी १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला पालकांनाच विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे लागते.
वाहन करातून सूट तरीही भाडे दुप्पट
शाळांच्या स्वत:च्या किंवा करार झालेल्या स्कूल बस व स्कूल व्हॅनला वाहन करातून सूट दिली जाते, परंतु त्यानंतरही अनेक बस व व्हॅनकडून दुप्पट भाडे आकारले जात आहे.
अवैध वाहतुकीला प्रोत्साहन
स्कूल व्हॅन व स्कूल बसचे दर दरवर्षी वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पालकांना नाईलाजाने कमी दरात धावणाऱ्या अवैध वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करावी लागत आहे. काही बस व व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविले जात आहे. एकूणच विद्यार्थ्यांची वाहतूक धोक्यात आली आहे.
दर ठरविण्याची जबाबदारी शालेय परिवहन समितीची
स्कूल बस किंवा स्कूल व्हॅनचे दर ठरविण्याची जबाबदारी त्या-त्या शाळेतील शालेय परिवहन समितीची आहे. नुकत्याच झालेल्या शालेय बस सुरक्षितता बैठकीत शहर आरटीओने हा विषय मांडला. बैठकीत शिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळांना याची माहिती देऊन दर ठरविण्याचा सूचना केल्या आहेत.
अतुल आदे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर आरटीओ
८ते १० टक्क्यांनी वाढ
स्कूल बसच्या तुलनेत स्कूल व्हॅनचे दर कमीच असतात. पेट्रोलचे दर स्थिर राहत नाही. ते वाढतच चालले आहे. यातच व्हॅनचा देखभालीचा खर्च, नियमावलीचे पालन, शाळेला द्यावे लागणारे शुल्क, आरटीओचा कर यातून फार कमी पैसे चालकाच्या हातात पडतात. यामुळे या वर्षी ८-१० टक्क्यांनी स्कूल व्हॅन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेमंत गजभिये
सचिव, स्कूल व्हॅन चालक संघटना

 

Web Title: Nagpur school bus, van fee up 10 pc increase: Parental robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.