सर्वाधिक मानवी चाचणी करणारे नागपूर दुसरे सेंटर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 05:15 AM2020-08-03T05:15:50+5:302020-08-03T05:16:00+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : भारतात तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोज ३७५ व्यक्तींना देऊन पहिला टप्पा थांबविण्यात आला. मानवी ...
सुमेध वाघमारे
नागपूर : भारतात तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोज ३७५ व्यक्तींना देऊन पहिला टप्पा थांबविण्यात आला. मानवी चाचणीत सहभागी असलेल्या देशातील १२ सेंटरमधून नागपूरच्या गिल्लूरकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे सर्वाधिक मानवी चाचणी करणारे दुसरे सेंटर ठरले. हॉस्पिटलने ५५ व्यक्तींना लस दिली, तर पीजीआय रोहतकने ८१ व्यक्तींना लस दिली. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने 'कोव्हॅक्सिन वॉरियर्स’ होण्याचे आवाहन केल्याने १००वर वॉरियर्स पुढे आले आहेत.
भारतीय औषध महानियंत्रकने (डीसीजीआय) कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीला परवानगी दिल्यानंतर भारत बायोटेक, पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटयूट आॅफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही), इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या तीन संस्थाच्या देखरेखीत ही मानवी चाचणी होत आहे. सुरुवातीला एम्स दिल्ली, एम्स पाटणा, निझामुद्दीन इन्स्टिट्यूट हैदराबाद व पीजीआय रोहतक या चार संस्थांनी चाचणीला सुरुवात केली. या संस्था मिळून ५० व्यक्तींना लस दिल्यानंतर व कुणाच्याही आरोग्याचा तक्रारी नसल्याने उर्वरीत आठ संस्थांना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार नागपूरमधील गिल्लूरकर हॉस्पिटलने ६०वर व्यक्तींची तपासणी करून त्यांच्या रक्ताचे नमुने दिल्लीच्या प्रयोगशाळेत पाठविले. यातील ५५ व्यक्तींच्या रक्ताचे नमुने योग्य ठरले. २७ जुलै रोजी एका महिलेसह दोन पुरुष असे तिघांना कोविड प्रतिबंधक 'कोव्हॅक्सिन’चा पहिला डोज देऊन राज्यात मानवी चाचणीचा शुभारंभ केला. दुसऱ्या दिवशी एका विद्यार्थ्यासह तीन पुरुष अशी चौघांना लस देण्यात आली. त्यानंतर पुढील चार दिवसात उर्वरीत ४८ व्यक्तींना ही लस देण्यात आली.
१४ दिवसानंतर दुसºया डोजला सुरुवात
गिल्लूरकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी सांगितले की, लस देण्यात आलेल्यांच्या रक्ताची तपासणी १४ दिवसानंतर केली जाईल. त्यानंतर त्यांना कोव्हॅक्सिन लसीच्या दुसºया डोज देण्यात येईल. पहिला डोज ‘०.५ मिलि’चा होता. आता तो वाढवून देण्यात येणार आहे.
लसीचा पहिला डोज दिलेल्यांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टरांची चमू लक्ष ठेवून आहे. सर्वांचीच प्रकृती उत्तम आहे. एका पुरुषाला काही मिनिटांसाठी थकवा आल्यासारखे जाणवले होते, परंतु थोड्यावेळातच तो बराही झाला. आता त्याला कुठलीही समस्या नाही. पहिल्या डोजचे चांगले रिझल्ट येण्याची शक्यता आहे.
-डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर, संचालक, गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल