नागपुरात बनावट खाद्यतेलाचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:44 AM2018-10-21T00:44:02+5:302018-10-21T00:44:52+5:30

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) धाडीत बनावट खाद्यतेलाचा १.३३ लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

In Nagpur seized stock of fake edible oil | नागपुरात बनावट खाद्यतेलाचा साठा जप्त

नागपुरात बनावट खाद्यतेलाचा साठा जप्त

Next
ठळक मुद्देएफडीएची कारवाई : १.३३ लाखांचा साठा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) धाडीत बनावट खाद्यतेलाचा १.३३ लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे १९ आॅक्टोबरला अन्न सुरक्षा अधिकारी एस.व्ही. बाभरे व म.दे. तिवारी यांनी श्रीधर शालिकराम बोडखे यांचे सावनेर तालुक्यातील खापरखेडा मेन रोड येथील गुरुकृपा किराणा स्टोअर्स आणि गोदामाची तपासणी केली. त्या ठिकाणी रिफाईन्ड सोयाबीन तेल (अंबुजा गोल्ड) या कंपनीचे लेबल असलेले १०१ टिनाचे डबे (एक डबा १५ किलो) विक्रीसाठी आढळले. तेलाच्या डब्यावर कंपनीचा लोगो मुद्रित केलेला नव्हता व लेबलवर विसंगती आढळली. डबे कुणाकडून खरेदी केले आणि पुरवठादाराबाबत दुकानदार कोणतीही माहिती देऊ शकला नाही.
खाद्यतेलाचे दोन नमुने विश्लेषणास्तव घेऊन उर्वरित १ लाख ३६ हजार रुपयांचा १५११.८८ किलो साठा जप्त केला. नमूने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. नमून्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग नागपूरचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) शरद कोलते यांच्या नेतृत्वात कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली.
सणासुदीच्या दिवसांचा विचार करता खाद्य पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता जास्त असल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे धडक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. ग्राहकांना अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत काही संशय असल्यास विभागाकडे तक्रार नोंदविता येईल, असे केकरे यांनी सांगितले.

Web Title: In Nagpur seized stock of fake edible oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.