नागपुरात सेल्फीच्या नादात तरुणाने जीव गमावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 02:00 PM2018-07-07T14:00:54+5:302018-07-07T14:02:12+5:30
शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे नागपुरातील अनेक नाल्यांना पूर आला आहे. अशा वेगाने वाहत्या नाल्याच्या पाण्यात उभे राहून सेल्फी काढणे एका तरुणाच्या जीवावर बेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे नागपुरातील अनेक नाल्यांना पूर आला आहे. अशा वेगाने वाहत्या नाल्याच्या पाण्यात उभे राहून सेल्फी काढणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे तो तरुण नाल्यात वाहून गेला. शुक्रवारी सकाळी १०. ३० च्या सुमारास ही घटना घडली. निलेश होलीराम सावके (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो सावरबांधे लेआऊटमध्ये राहत होता.
शुक्रवारी नागपुरात पावसाने अक्षरश: थैमान घातले होते. संपूर्ण शहरच जलमय झाले होते. शहराच्या सीमेलगतच्या वस्त्या, झोपडपट्टयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. नदी, नाले दुथडी भरून वाहत असताना निलेश सावके हा हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दौलतनगर, आराधना को-आॅपरेटीव्ह सोसायटीजवळच्या नाल्याला आलेला पूर पहायला गेला. तेथे त्याने नाल्याच्या काठावर पाण्यात उभे होऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. सेल्फीच्या नादात निलेशला काही भान उरले नाही आणि पाण्याच्या प्रवाहात तो वाहत गेला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दुपारी ४.३० च्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला. माहिती कळताच हुडकेश्वर पोलिसांनी होलीराम मारोतराव सावके (वय ५६) यांच्या तक्रारीवरून प्रकरणाची नोंद केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.