नागपुरात सेनापती उत्तमबाबाने केला हत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:30 AM2019-06-05T00:30:18+5:302019-06-05T00:38:05+5:30
नेतृत्वाच्या मुद्यावरून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तृतीयपंथीयांच्या दोन गटातील वादाला मंगळवारी हिंसक वळण मिळाले. तृतीयपंथीयांचा सेनापती (गुरू) म्हणून ओळखला जाणाऱ्या तृतीयपंथी उत्तमबाबाने आपल्या साथीदारांसह विरोधी गटातील तृतीयपंथी चमचम गजभियेवर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात चमचम गंभीर जखमी झाली. कळमन्यातील कामनानगरात मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नेतृत्वाच्या मुद्यावरून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तृतीयपंथीयांच्या दोन गटातील वादाला मंगळवारी हिंसक वळण मिळाले. तृतीयपंथीयांचा सेनापती (गुरू) म्हणून ओळखला जाणाऱ्या तृतीयपंथी उत्तमबाबाने आपल्या साथीदारांसह विरोधी गटातील तृतीयपंथी चमचम गजभियेवर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात चमचम गंभीर जखमी झाली. कळमन्यातील कामनानगरात मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
नागपूर-विदर्भाच्या तृतीयपंथीयांच्या गटाची गादी उत्तमबाबा काही वर्षांपासून सांभाळतो आहे. त्याच्या नेतृत्वाला तृतीयपंथीयांच्याच दुसऱ्या एका गटाचा तीव्र विरोध आहे. या विरोधामुळे उत्तर नागपुरात दोन्ही गटांकडून परस्परांवर हल्ले, एकमेकांना धमक्या देणे आदी प्रकार घडले आहेत. दोन वर्षांपूर्वी उत्तमबाबाने विरोधी गटातील तृतीयपंथीयांवर फायरिंगही केले होते. तर, विरोधी गटाने वर्षभरापूर्वी जोरदार हल्ला चढवून त्याला मारहाणही केली होती. पाचपावली, लकडगंज, वर्धमाननगर, जरीपटका, तहसील आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन्ही गटांनी परस्परांविरोधात अनेक तक्रारी नोंदविल्या आहेत. त्यांच्यातील हाणामाºया आता नेहमीचाच प्रकार झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून पैश्याच्या हिस्सेवाटणीमुळे या दोन गटातील धुसफूस पुन्हा तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी दुपारी १. ३० वाजता उत्तमबाबाने चट्टू उर्फ कलम उईके, किरण गौरी, निसार शेख आणि साथीदारांसह कळमन्यातील कामनानगरात राहणाऱ्या प्रवीण उर्फ चमचम प्रकाश गजभियेच्या घरी जाऊन चमचमवर चाकूने प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात चमचम गंभीर जखमी झाली.
विशेष म्हणजे, रोजची फेरी आटोपून चमचम आणि तिचे साथीदार काही वेळेपूर्वीच घरी परतले होते. तेथे ते पैश्याची हिस्सेवाटणी करताना हा प्रकार घडला. गंभीर जखमी झालेल्या चमचमला तिच्या सहका-यांनी रुग्णालयात हलविले. या घटनेची माहिती कळताच कळमना परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. शहरातील तृतीयपंथीयांनी मोठ्या संख्येत कामठी मार्गावरील रुग्णालय आणि कळमना ठाण्यात धाव घेतली. ठाण्यासमोर त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, हल्ल्यात चमचमच्या डोक्यावर, कानावर आणि हातावर शस्त्राचे घाव आहे. मोठा रक्तस्राव झाल्याने चमचमची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर कामठी मार्गावरील खासगी इस्पितळात उपचार सुरू आहे. ती कोमात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेने निर्माण झालेला तणाव बघता वरिष्ठांनी त्या भागात लगेच मोठा बंदोबस्त लावला. शीघ्र कृती दलाचे जवानही या भागात तैनात करण्यात आले. गुन्हेशाखेचाही ताफा तेथे पोहचला. धावपळ करून कळमना पोलिसांनी उत्तमबाबा आणि चट्टू ऊर्फ कलम उईके, किरण गौरी, निसार शेख यांना ताब्यात घेतले.
फेरीचा वाटा देण्यास नकार
तृतीयपंथियाचा सेनापती (गुरु) म्हणून उत्तमबाबाची ओळख आहे. त्याने महापालिकेची निवडणूकही लढवली होती. काही दिवसांपूर्वी उत्तम बाबाला जिवंत काडतूस आणि माऊजरसह पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतरही त्याची आणि विरोधी गटाची गुंडगिरी सुरूच राहिली. कळस म्हणजे, वर्षभरापूर्वी नंदनवन पोलीस ठाण्यात त्यांनी विवस्त्रावस्थेत गोंधळ घालून पोलिसांना ठाण्यातून पळवून लावले होते. या पार्श्वभूमीवर उत्तम बाबाच्या नेतृत्वाला गेल्या दोन वर्षांत अनेकांनी आव्हान दिले आहे. अलिकडे चमचमनेही स्वत:ला गुरुबाबा म्हणवून घेत अनेक शिष्यांना आपल्या गटात ओढून घेतले आहे. रोज मिळणाऱ्या फेरीत (फिरून आणलेल्या पैशात) गुरुचा वाटा असतो. तो देण्यास उत्तमबाबाला नकार दिल्यामुळे काही दिवसांपासून चमचम गजभिये आणि उत्तम बाबा यांच्यातील वैमनस्य टोकाला गेले होते. आज त्याचा भडका उडाला.
गुन्हेगारी पार्श्वभूमी
तृतीयपंथी मवाळ आणि मायाळू स्वभावाचे असल्याचे समजले जाते. मात्र, नागपुरातील तृतीयपंथी गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीमुळे वेगळीच ओळख निर्माण करून गेले आहे. एकमेकांवर भरबाजारात हल्ले चढवून गंभीर जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. या संबंधाने वर्षभरापूर्वी लकडगंज ठाण्यात पोलीस उपायुक्त राहुल माकणिकर यांनी दोन्ही गटांना एकत्र बसवून त्यांच्यातील वाद संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काही दिवस हे दोन्ही गट शांत झाल्याचे जाणवत होते. मात्र, त्यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरूच असल्याचे आजच्या गुन्ह्यातून स्पष्ट झाले.