नागपूर सत्र न्यायालय : वडिलाचा खून करणाऱ्या मुलाला दहा वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:12 PM2019-12-24T23:12:56+5:302019-12-24T23:14:50+5:30
सत्र न्यायालयाने वडिलाचा खून करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या मुलाला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने वडिलाचा खून करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या मुलाला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी हा निर्णय दिला. ही घटना तहसील पोलिसांच्या हद्दीत घडली होती.
अमित श्यामसुंदर नायडू (३४) असे आरोपीचे नाव असून तो रेल्वे क्वॉर्टर येथील रहिवासी आहे. त्याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात (भादंवि कलम ३०४-दोन) दोषी ठरविण्यात आले. अमित काहीच कामधंदा करीत नव्हता. त्याला दारुचे व्यसन होते. गुन्हेगारी वृत्तीमुळे तो अनेकदा कारागृहात गेला होता. त्यामुळे मध्य रेल्वेत कार्यरत वडील श्यामसुंदर त्याच्यावर चिडचिड करीत होते. १० एप्रिल २०१८ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास अमित व श्यामसुंदर यांचे कडाक्याचे भांडण झाले. दरम्यान, श्यामसुंदर यांनी अमितला थापड मारली. त्यावरून चिडून अमितने श्यामसुंदर यांना स्टीलच्या गंजाने व लाकडी फळीने जबर मारहाण केली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. पंकज तपासे यांनी कामकाज पाहिले.