नागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय :बलात्काऱ्याला १० वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 08:31 PM2018-11-27T20:31:19+5:302018-11-27T20:31:48+5:30
सत्र न्यायालयाने असहाय्य महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १० महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस.एस. दास यांनी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने असहाय्य महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १० महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस.एस. दास यांनी हा निर्णय दिला.
अनिल अशोक गिऱ्हे (२७) असे आरोपीचे नाव असून तो खापरखेडा येथील रहिवासी व व्यवसायाने आॅटोचालक आहे. प्रकरणातील दुसरा आरोपी विशाल ऊर्फ बाबा ऊर्फ पांडे रमेश गेडाम (२२) याला न्यायालयाने ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडले. दंडाची रक्कम पीडित महिलेस अदा करण्याचे निर्देश सरकारला देण्यात आले आहेत. महिला मध्य प्रदेशमधील रहिवासी आहे.
ही घटना ७ एप्रिल २०१५ रोजी रात्री १०.३० च्या सुमारास नांदा शिवार येथे घडली होती. पीडित महिला नागपूर रेल्वेस्थानकावरून आरोपीच्या आॅटोत बसली होती. तिच्यासोबत आणखी काही प्रवासी होते. महादुला येथे सर्व प्रवासी उतरल्यानंतर आरोपीने महिलेला ठार मारण्याचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. महिलेने दुसऱ्या दिवशी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक सुचिता देशमुख यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारच्या वतीने अॅड. वर्षा सायखेडकर यांनी कामकाज पाहिले.