Nagpur: इंग्रजकालीन नियमाची रेल्वेकडून स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत अंमलबजावणी
By नरेश डोंगरे | Published: July 16, 2024 07:32 PM2024-07-16T19:32:53+5:302024-07-16T19:33:12+5:30
Nagpur: वेटिंग तिकिट काढून रिझर्वेशनच्या डब्यात बसायचे. पुढे टीसीच्या हातात दंडाची रक्कम भरून आपला प्रवास सुरळीत करून घ्यायचा, हा प्रकार आता चालणार नाही. टीसी दंडाची रक्कम वसूल करेलच मात्र लगेच तुम्हाला त्या डब्यातून खालीदेखिल उतरवून देईल.
- नरेश डोंगरे
नागपूर - वेटिंग तिकिट काढून रिझर्वेशनच्या डब्यात बसायचे. पुढे टीसीच्या हातात दंडाची रक्कम भरून आपला प्रवास सुरळीत करून घ्यायचा, हा प्रकार आता चालणार नाही. टीसी दंडाची रक्कम वसूल करेलच मात्र लगेच तुम्हाला त्या डब्यातून खालीदेखिल उतरवून देईल. होय, इंग्रजांच्या काळातील या नियमाची रेल्वेकडून आता स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत अंमलबजावणी सुरू झाली आहे.
लांबचा प्रवास म्हटला की सर्वप्रथम रेल्वेच नजरेसमोर येते. कारण प्रवासात ईतर सुविधा तर असतातच मात्र तिकिट कन्फर्म असेल तर बर्थवर झोपूनही जाता येते. त्यामुळे रोज लाखो प्रवासी रेल्वेचे तिकिट काढतात. मात्र, अनेकांना कन्फर्म तिकिट मिळत नाही.
विशेष म्हणजे, तिकिट ऑनलाईन केले असेल आणि ते प्रतिक्षा यादीवर असल्यास कन्फर्म न झाल्यामुळे आपोआप रद्द होते. मात्र, प्रत्यक्ष काऊंटरवर काढलेले तिकीट रद्द होत नाही. त्यामुळे अनेक जण वेटींग तिकिट घेऊन आरक्षित डब्यातून प्रवास करतात. गेल्या जून महिन्यापर्यंत वेटींगचे तिकिट जवळ घेऊन प्रवासी आरक्षित कोचमध्ये चढून प्रवास करायचे. तिकिट तपासणीस जवळ आल्यास तो ते तिकिट पाहून संबंधित प्रवाशाकडून दंडाची रक्कम घेऊन पावती हातात ठेवायचा आणि निघून जायचा. दुसरीकडे दंड भरल्यामुळे संबंधित प्रवासी पुढचा प्रवास त्याच कोचमधून करीत होता. मात्र आता दंड भरल्यावरदेखिल संबंधित प्रवासी त्या कोचमधून प्रवास करु शकणार नाही. कारण अशा प्रवाशांमुळे त्या कोचमध्ये प्रवाशांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त व्हायची आणि त्यामुळे कन्फर्म तिकिट घेऊन बसलेल्यांना अशा अतिरिक्त प्रवाशांच्या गर्दीचा त्रास व्हायचा.
त्यासंबंधाने ओरड, तक्रारी वाढल्याने रेल्वेने आता वेटींग तिकिटावर रेल्वेतून प्रवास करण्यासंदर्भात मोठे बदल केले आहे. त्यानुसार, वेटींग तिकिटावर रेल्वे प्रवास केल्यास टीटी संबंधित प्रवाशाकडून दंडाची रक्कम वसूल करेल. एवढेच नव्हे तर दंड घेतल्यानंतर त्या प्रवाशाला पुढच्या स्थानकावर त्या डब्यातून उतरवूनसुद्धा देणार आहे.
रेल्वेचा हा नियम इंग्रजांच्या काळातच तयार करण्यात आला होता. मात्र, त्याकडे कानाडोळा केला जात होता. आता मात्र त्याची कठोरपणे अंमलबजावणी सुरु झाली आहे.
... तर, तिकिट रद्द करून रक्कम परत घ्या !
यापुढे काउंटरवर जाऊन तुम्ही तिकिट काढले असेल आणि ते प्रवासाच्या वेळेपर्यंत कन्फर्म झाले नसेल तर तिकिट रद्द करून प्रवासी आपले पैसे परत घेऊ शकतात. असे न करता त्या तिकिटावर प्रवास केल्यास तिकिट कन्फर्म होणार नाही आणि नाहक दंडाचीही रक्कम भरावी लागणार आहे.