विदर्भात थंडीचा जोर वाढला; नागपूर ८.३ तर गाेंदिया ८.८ अंश सेल्सिअस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 10:20 AM2022-01-28T10:20:37+5:302022-01-28T10:25:48+5:30
नागपुरात रात्रीचे तापमान २४ तासात १.५ अंश तर ४८ तासात ५.८ अंशाने खाली घसरले आहे. नागपूर खालाेखाल ८.८ अंशासह गाेंदिया व बुलडाणा दुसऱ्या क्रमांकाचे थंड शहर हाेते.
नागपूर :हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भाला थंडीने चांगलेच गारठले आहे. उत्तरेकडे बदललेल्या हवामानाचे परिणाम मध्य भारतातही दिसून येत असून विदर्भात थंडीची लाट पसरू लागली आहे. गुरुवारी रात्रीच्या ८.३ अंश किमान तापमानासह नागपूर सर्वात थंड शहर ठरले. वेधशाळेने आधीच तीन दिवस विदर्भात थंडीची लाट येणार असल्याचा येलाे अलर्ट जारी केला आहे.
उत्तर प्रदेश आणि शेजारील प्रदेशात निर्माण झालेले वेस्टर्न डिस्टरबन्स आणि सायक्लाेनिक सर्क्युलेशनमुळे वातावरणात बदल झाला आहे. वाऱ्याच्या चालीमुळे थंडीची लाट महाराष्ट्रातही पाेहोचली आहे. नागपूर वेधशाळेने २८ जानेवारीपर्यंत नागपूरसह अकाेला, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा, गाेंदिया, भंडाऱ्यात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. यादरम्यान हिमालयाच्या भागात २९ जानेवारीला नव्याने वेस्टर्न डिस्टरबन्स तयार हाेत असून, त्याचा परिणामस्वरूप देशाच्या काही भागात पाऊस आणि थंडी वाढण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भासह मध्य भारतात वातावरण स्थिर व काेरडे राहणार असल्याचे वेधशाळेने व्यक्त केले आहे.
नागपुरात रात्रीचे तापमान २४ तासात १.५ अंश तर ४८ तासात ५.८ अंशाने खाली घसरले आहे. नागपूर खालाेखाल ८.८ अंशासह गाेंदिया व बुलडाणा दुसऱ्या क्रमांकाचे थंड शहर हाेते. विदर्भातील इतर जिल्ह्यामध्ये अकाेला ९.३ अंश, वर्धा ९.४ अंश, ब्रह्मपुरी ९.८ अंश, अमरावती व यवतमाळ १० अंश, गडचिराेली ११ अंश, चंद्रपूर ११.४ अंश नाेंद झाली आहे.