Nagpur: धक्कादायक! नागपुरातील अटकेतील ६३ टक्के गुन्हेगार तिशीच्या आतील तरुणतुर्क, सुशिक्षितदेखील पोहोचले लॉकअपमध्ये
By योगेश पांडे | Published: September 2, 2024 06:16 AM2024-09-02T06:16:58+5:302024-09-02T06:17:25+5:30
Nagpur Crime News: २०२४ मधील पहिल्या आठ महिन्यांत नागपुरात भारतीय दंड विधान तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत दहा हजारांहून अधिक लहान मोठे गुन्हे दाखल झाले. तर याच कालावधीत साडेतीन हजारांहून अधिक गुन्हेगारांना अटक करण्यात आली. यातील ६३ टक्के गुन्हेगार हे तिशीच्या आतील असून त्यात महिलांचीदेखील लक्षणीय संख्या आहे.
- योगेश पांडे
नागपूर : २०२४ मधील पहिल्या आठ महिन्यांत नागपुरात भारतीय दंड विधान तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत दहा हजारांहून अधिक लहान मोठे गुन्हे दाखल झाले. तर याच कालावधीत साडेतीन हजारांहून अधिक गुन्हेगारांना अटक करण्यात आली. यातील ६३ टक्के गुन्हेगार हे तिशीच्या आतील असून त्यात महिलांचीदेखील लक्षणीय संख्या आहे. नागपुरातील तरुण गुन्हेगारांची ही संख्या चिंताजनक असून यातून एकूण व्यवस्थेबाबतच विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत नागपुरात १० हजारांहून अधिक गुन्हे नोंदविण्यात आले. या गुन्ह्यांसोबतच मागील प्रकरणांचा तपासदेखील पोलिसांच्या विविध पथकांकडून सुरू होता. पोलिसांनी ३ हजार ६९२ जणांना विविध प्रकरणांत अटक केली. यात १८ ते ३० या वयोगटातील २ हजार ३३९ जणांचा समावेश होता. यात अनेक सुशिक्षित तरुणांचादेखील समावेश आहे. हा आकडा निश्चितच अनेकांच्या डोळ्यात अंजन टाकणार आहे. आकड्यांनुसार ३१ ते ४५ या वयोगटातील १ हजार ५०, ४६ ते ६० या वयाच्या २७६ आरोपींना अटक करण्यात आली.
आजी-आजोबांच्या वयाचेदेखील पोहोचले लॉकअपमध्ये
या सात महिन्यांत साठी ओलांडलेल्या २७ आरोपींनादेखील अटक करण्यात आली. आजीआजोबांच्या वयाचे हे आरोपी विविध गुन्ह्यांत लॉकअपमध्ये पोहोचले. यात पाच महिलांचादेखील समावेश होता.
बंटीच नव्हे बबलींनादेखील अटक
सात महिन्यांच्या कालावधीत १८६ महिलांनादेखील विविध गुन्ह्यात अटक करण्यात आली. यात १८ ते ३० या वयोगटातील ६७, ३१ ते ४५ या वयोगटातील ७८ आरोपींचा समावेश होता. चोरी, फसवणूक, अवैध दारूविक्री या प्रकरणात महिलांविरोधात जास्त गुन्हे दिसून आले.
वयनिहाय अटकेतील पुरुष
महिना : १८ ते ३० : ३१ ते ४५ : ४६ ते ६० : ६१ हून अधिक : एकूण
जानेवारी : २३० :१३३ : ३० : ३ : ३९६
फेब्रुवारी : २६८ : १०० : २७ : १ : ३९६
मार्च : ३१२ : १२७ : ३६ : ४ : ४७९
एप्रिल : २४२ : ९८ : २५ : २ : ३६७
मे : २८४ : ११८ : ३६ : ३ : ४४१
जून : ३४५ : ११९ : ३३ : १ : ४९८
जुलै : २८४ : १४२ : २७ : ४ : ४५७
ऑगस्ट : ३०७ : १३५ : २६ : ४ : ४७२
वयनिहाय अटकेतील महिला
महिना : १८ ते ३० : ३१ ते ४५ : ४६ ते ६० : ६१ हून अधिक : एकूण
जानेवारी : ८ : ५ : ४ : ० : १७
फेब्रुवारी : २ : ५ : २ : ० : ९
मार्च : ३ : ९ : २ : २ : १६
एप्रिल : ६ : ११ : ४ : ० : २१
मे :७ : ११ : ५ : ० : २३
जून : १२ : १६ : ९ : ० : ३७
जुलै : १६ : १४ : ४ : १ : ३५
ऑगस्ट : १३ : ७ : ६ : २ : २८
तरुणांकडून घडणारे प्रमुख गुन्हे
- हत्या
- प्राणघातक हल्ला
- चोरी
- वाहनचोरी
- घरफोडी
- अत्याचार
- विनयभंग
- फसवणूक