Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
By कमलेश वानखेडे | Updated: May 25, 2024 21:50 IST2024-05-25T21:49:32+5:302024-05-25T21:50:42+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: नागपूर लोकसभा मतदार संघातील एका बुथवरील मतदान मोजण्यातच येणार नसल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली आहे. या केंद्रावर ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच मतदान घेतले गेल्याची माहिती मतदानाच्या तब्बल ३५ दिवसानंतर समोर आली आहे.

Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
- कमलेश वानखेडे
नागपूर - नागपूर लोकसभा मतदार संघातील एका बुथवरील मतदान मोजण्यातच येणार नसल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली आहे. या केंद्रावर ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच मतदान घेतले गेल्याची माहिती मतदानाच्या तब्बल ३५ दिवसानंतर समोर आली आहे. या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे.
लोकसभा निवडणूकीतील मतमोजणीला अवघे नऊ दिवस शिल्लक आहे. मात्र, निवडणूक यंत्रणेतील त्रुटी संपताना दिसत नाहीत. मतदानाच्या दिवशी नियमानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर सकाळी साडेपाच वाजता मॉक पोलिंग (प्रारुप मतदान) घेण्यात येतो. त्यानंतर कंट्रोल युनिटवरील क्लोज रिजल्ट क्लिअर करुन प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत असते. मात्र प्राप्त माहितीनुसार मतदान केंद्र क्र. २३३, दादाजी धुनिवाले महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा, रविनगर या केंद्रावर मॉक पोलिंग क्लिअर न करताच मतदान घेण्यात आले. या मतदान केंद्रावर एकूण ८६५ मतदान होते. त्यापैकी ३१५ जणांनी मतदान केल्याचे १७ सी फॉर्मनुसार दिसून येत आहे. यातही मॉक पोल किती आणि किती जणांनी मतदान केले हे समजून येत नाही.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नागपूर पश्चिम विधानसभा क्षेत्र यांनी ३० एप्रिल २०२४ रोजी नागपूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी याबद्दल कळविले. मात्र याबाबतची माहिती मतदानाच्या दिवशीच १९ एप्रिल रोजी समोर येणे गरजेचे होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी १५ मे रोजी सर्व उमेदवारांना एकापत्राद्वारे याबाबत कळविण्यात आले. या पत्रानुसार आता ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत या केंद्रावरील मते मोजण्यातच येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जाहीर केले आहे. तसेच व्हीव्हीपॅट स्लीपद्वारे अनिवार्य पडताळणीकरिता निवडता येणाऱ्या पाच केंद्रांमध्येही या केंद्राचे समावेश करता येणार नाही असेही निवडणूक निर्णय अधिकारी याने जाहीर केले आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांकडून पत्रच मिळाले नाही : आ. विकास ठाकरे
मतदान केंद्र क्र. २३३, दादाजी धुनिवाले महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा, रविनगर या केंद्रावर झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार नाही, अशा आशयाचे कुठलेही पत्र उमेदवार म्हणून आपल्याला मिळालेले नाही, असे आ. विकास ठाकरे यांनी स्पष्ट केले. ठाकरे म्हणाले, यासंदर्भात २४ मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार करून या केंद्रावर फेरमतदानाची मागणी केली आहे. तसेच लोकशाहीने दिलेल्या मतदानाच्या अधिकारापासून नागरिकांना वंचित ठेवणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणीही ठाकरे यांनी केली आहे.