नागपूर हादरले, बेपत्ता झालेल्या तीन चिमुकल्यांचे कारमध्येच आढळले मृतदेह

By योगेश पांडे | Published: June 18, 2023 10:23 PM2023-06-18T22:23:40+5:302023-06-18T22:25:06+5:30

परिसरातीलच कारमध्ये अडकल्याचा संशय :

Nagpur shook, bodies of three missing children found in car in pachpawali, police rushed | नागपूर हादरले, बेपत्ता झालेल्या तीन चिमुकल्यांचे कारमध्येच आढळले मृतदेह

नागपूर हादरले, बेपत्ता झालेल्या तीन चिमुकल्यांचे कारमध्येच आढळले मृतदेह

googlenewsNext

नागपूर : रविवारचा दिवस नागपुरातील समाजमन हादरविणारा ठरला. पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फारुखनगरमधून शनिवारी बेपत्ता झालेल्या दोन लहान मुली व एका मुलाचा मृतदेहच आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या घराजवळील परिसरातच उभ्या असलेल्या एका कारमध्ये हे मृतदेह आढळले. यामुळे परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारमध्ये खेळता खेळता ते अडकल्याचा संशय वर्तविण्यात येत असून रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा सुरू होता.

आलिया फिरोज खान (वय ६), आफरीन इर्शाद खान (वय ६) आणि तौसिफ फिरोज खान (वय ४), अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. फारुखनगरच्या मोहम्मदिया मस्जिदजवळ राहणारी ही तीन मुले शनिवारी दुपारी बेपत्ता झाली होती. नातेवाइकांनी आजूबाजूच्या भागांमध्ये शोध घेतल्यावरदेखील न आढळल्याने पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनीदेखील विविध माध्यमांतून शोध घेण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावरदेखील पोलिसांनी माहिती प्रसारित केली. रविवारी दुपारनंतर पोलिसांनी श्वानपथकाच्या माध्यमातून शोध सुरू केला. त्यावेळी एका वाहनाजवळ श्वानाने इशारा दिला. पोलिसांनी कार उघडून पाहिली असता त्यात तिघेही निपचित पडलेले आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. यामुळे परिसरात शोककळा पसरली होती.

पोलिसांचा फौजफाटा तैनात
फारुखनगर भागात ही घटना वाऱ्यासारखी पसरली व नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. रात्री नऊ वाजेच्या सुमारास घटनास्थळाजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन, उपायुक्त गोरख भामरे हेदेखील घटनास्थळी पोहोचले. तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता
या मुलांचा नेमका मृत्यू कसा झाला याबाबत विविध कयास लावण्यात येत आहे. घटनास्थळाजवळ राहणारे रहिवासी व पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कार काही दिवसांपासून या मुलांच्या घराजवळच उभी होती. खेळता खेळता मुले आत गेली व लॉक झाल्याची शक्यता आहे. गरमीमुळे कारच्या आतील तापमान वाढले असावे व त्यात गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. कारच्या काचांना काळी फिल्म असल्याने बाहेरून लोकांना मुले दिसली नसतील व त्यांचा आवाजदेखील बाहेर येऊ शकला नसेल. दरम्यान, लॉक नव्हती का व वर्दळीचा भाग असताना मुले आत कशी गेली याचा तपास सुरू आहे. दरम्यान, फॉरेन्सिक पथकाकडून रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती.

Web Title: Nagpur shook, bodies of three missing children found in car in pachpawali, police rushed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.