अवयवदानातही नागपूरकरांनी व्हावे ‘स्मार्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 01:34 AM2017-08-14T01:34:43+5:302017-08-14T01:35:35+5:30
अवयव दान एक महादान आहे. मेंदू मृत व्यक्तीचे अवयवदान इतरांच्या आयुष्यातील आशेचा किरण ठरू शकते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवयव दान एक महादान आहे. मेंदू मृत व्यक्तीचे अवयवदान इतरांच्या आयुष्यातील आशेचा किरण ठरू शकते. अवयवदान हीच काळाच गरज आहे. हाच विचार समोर ठेवून मृत्यूनंतर अवयवांचे दान करण्यात नागपूरकरांनी ‘स्मार्ट’ व्हावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी येथे केले.
जागतिक अवयवदान दिन रविवारी दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या प्रसंगी महापौर जिचकार यांनी अर्ज भरून अवयव दानाचा संकल्प केला. इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूर शाखेसह जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, नागपूर रोटरी क्लब, अकादमी आॅफ मेडिकल सायन्स, जनआक्रोश, जेसिस क्लब आॅफ नागपूर, मोहन फाऊंडेशन, विभागीय अवयवदान समिती, बाहो रुग्णालय आदी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. रॅलीत ‘आयएमए’च्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत, डॉ. वाय एस देशपांडे, डॉ. रवी चव्हाण, डॉ. समीर जहागीरदार, डॉ. प्रशांत राठी, डॉ. अनिल लद्दढ, रवी कासखेडीकर, डॉ. राजन, डॉ. अलका मुखर्जी, डॉ. शिवाणी बिंदये यांच्यासह वैद्यकीय विद्यार्थी, शहरातील डॉक्टर, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
रॅलीतून ‘मरावे परी देहरुपी उरावे’अशी घोषणा देत उपस्थितांचे लक्ष्य वेधले. रॅलीचा समारोप दीक्षाभूमी येथील सभागृहात झाला. यावेळी अवयवदान जागृतीवर माहिती सादर करण्यात आली. ग्रीन कॉरिडारसंदर्भात पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी माहिती दिली. यावेळी वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त रवींद्र परदेसी, पोलीस निरीक्षक गिरीश तातोड (प्रशासन) उपस्थित होते.
हृदय, यकृत प्रत्यारोपणही व्हावे : डॉ. वानखेडे
विभागीय अवयवदान समितीचे सचिव डॉ. रवि वानखेडे म्हणाले, उपराजधानीत दरवर्षी पन्नासपेक्षा जास्त मूत्रपिंड प्रत्यारोपण होतात. याची संख्या वाढण्याची गरज आहे. सध्याच्या स्थितीत ६० हजार रुग्ण हृदय तर ८५ हजार रुग्ण यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहे. दात्यांची कमतरता एवढी आहे की, बरेच रुग्ण प्रतीक्षा करत असतानाच जीवाला मुकतात. परंतु आता ज्या पद्धतीने शहराची जबाबदारी वाढत आहे, त्यानुसार ह्दय आणि यकृत प्रत्यारोपण करणारी यंत्रणा उभारण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे.